
पिंपरी | माणदेश एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
सांगवी परिसरातील जिल्हा रुग्णालय आवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यापासून पोलिसांपुढे हा एक गूढ कोडे बनला होता. कोणतीही ओळख नसलेली ही हत्या कुणी केली, कशी केली आणि मृत व्यक्ती कोण होती – हे सारेच अनाकलनीय होते. पण गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अत्यंत बारकाईने आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास करत केवळ एक कुरिअर पार्सलची पिशवी आणि काही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला.
मृतदेहाच्या ठिकाणी कोणताही ठोस पुरावा नव्हता
८ सप्टेंबर २०२४ रोजी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. कोणत्याही ओळखीचे चिन्ह नसल्याने आणि मृतदेह पूर्णपणे रक्तबंबाळ अवस्थेत असल्यामुळे प्रथमदर्शनी ओळख पटविणे अशक्य होते. पोलिसांनी घटनास्थळी विविध पथके रवाना केली, मात्र मृताची ओळख पटेना.
सीसीटीव्हीत मिळाला ‘क्लू’
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या नेतृत्वाखाली गुंडाविरोधी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. तपासादरम्यान सांगवी परिसरात एका दुचाकीवरून तिघेजण मृत व्यक्तीसह ट्रिपल सीट जात असल्याचे स्पष्ट दिसले.
त्यापैकी एकाच्या हातात असलेली पांढऱ्या रंगाची कुरिअर पार्सलची पिशवी हा तपासाचा टर्निंग पॉइंट ठरला.
कुरिअर पार्सलमधून सापडला संशयित
सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या पिशवीवरून पोलिसांनी परिसरातील कुरिअर कार्यालयांचा तपास घेतला. कृष्णा चौकातील एका कुरिअर कार्यालयात त्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी पार्सल दिल्याचे निष्पन्न झाले. त्या व्यवहारातून संशयिताचे नाव व मोबाईल नंबर पोलिसांनी मिळवले.
मोबाईल लोकेशनने दिला ठाव
मोबाईल क्रमांकाच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संबंधिताचे लोकेशन पारनेर तालुक्यात असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांचे पथक तात्काळ रवाना झाले. संशयित एका हॉटेलमध्ये थांबलेला असल्याचा अंदाज आल्यावर त्या भागातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यातून त्याच्या बसने प्रवासाची माहिती मिळाली.
समृद्धी महामार्गावर सापडला संशयित
सीसीटीव्ही फुटेज आणि ट्रॅव्हल्स बसच्या नंबरच्या आधारे पोलिसांनी बस चालकाशी संपर्क साधला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे सांगून बसचा वेग कमी ठेवण्यास सांगितले. चालकाने सहकार्य केल्याने वाशिम जिल्ह्यातील शेल टोल प्लाझावर ही बस अडवण्यात आली आणि संशयित ताब्यात घेतले गेले.
आरोपींची कबुली आणि मृताची ओळख
सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती. मात्र पोलिसांनी अत्यंत कुशलतेने संशयितांची चौकशी केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत इसम त्यांचा ओळखीचा मित्र असून त्याच्याशी काही वैयक्तिक कारणावरून वाद झाल्याने त्याचा खून केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मृताची ओळखही निश्चित करण्यात आली.