
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
गावाकडील गल्ल्यांमध्ये पूर्वी जोमाने खेळले जाणारे पारंपरिक खेळ आता पुन्हा एकदा शहरात झळकणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत **‘खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ’**चे आयोजन करण्यात आले असून, १३ ते २२ ऑगस्टदरम्यान कुर्ला येथील जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर हा क्रीडामहोत्सव पार पडणार आहे.
या उपक्रमाची संकल्पना कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक क्रीडा परंपरेला पुनरुज्जीवन देण्याचा आणि नवीन पिढीला या खेळांशी पुन्हा एकदा जोडण्याचा उद्देश आहे.
विविध पारंपरिक खेळांचा समावेश
या क्रीडा महाकुंभात लेझीम, फुगडी, लगोरी, विटी-दांडू, कुस्ती, रस्सीखेच, पंजा लढवणे, पावनखिंड दौड, दोरीच्या उड्या, योग, मल्लखांब, खो-खो, कबड्डी आदी पारंपरिक खेळांचे स्पर्धात्मक आयोजन करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी स्वतंत्र गट रचना करण्यात आली आहे.
सांस्कृतिक ठेवा जपण्याचा प्रयत्न
“हे खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत. काळाच्या ओघात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नवीन पिढीला हे खेळ अनुभवता यावेत, यासाठीच हा उपक्रम राबवला जात आहे,” असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
शाळा, आयटीआय व महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग
क्रीडा भारती संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील शाळा, आयटीआय आणि महाविद्यालयांमधून स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली जात आहे. या उपक्रमाला यापूर्वीदेखील भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदाही स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सहभागी होण्यासाठी संपर्क
या महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक संस्था, शाळा, महाविद्यालय किंवा क्रीडा मंडळांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 ९८६७०६६५०६ / ९७६८३२७७४५