
माणदेश एक्सप्रेस न्यूज, सांगली |
पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. साप चावल्यावर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. मात्र, सर्पमित्र आणि तज्ज्ञांच्या मते, योग्य माहिती आणि ‘नागलोकवाला गोल्डन रूल’ व ‘टाईम ट्रिक’ वापरली तर अशा प्रसंगी रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.
सर्पदंशानंतर अनेकजण घाबरतात आणि चुकीची पावलं उचलतात. काहीजण सापाचं विष शोषण्याचा प्रयत्न करतात, काहीजण झाडांची औषधी लावतात तर काहीजण सापाला मारायला जातात. हे सर्व प्रकार जीवावर बेतणारे ठरतात. त्यामुळे या चुका टाळणं अत्यंत आवश्यक आहे.
सर्पमित्रांच्या माहितीनुसार, साप चावल्यानंतर तात्काळ डॉक्टरांकडे जाणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. पहिल्या काही तासांना ‘गोल्डन अवर’ मानलं जातं. या काळात जर रुग्णाला योग्य अँटीव्हेनम इंजेक्शन मिळालं, तर विषाचा प्रभाव कमी करता येतो आणि मृत्यू टाळता येतो.
साप चावल्यावर काय करावं?
रुग्णाला शक्य तितकं शांत ठेवावं
जखमेच्या जागी हालचाल होणार नाही याची काळजी घ्यावी
जखमेला घट्ट पट्टी किंवा कोणतंही औषध लावू नये
तात्काळ रुग्णालयात रुग्णाला दाखल करावं
शक्य असल्यास सापाचा फोटो सुरक्षित अंतरावरून काढावा
काय करू नये?
सापाचं विष तोंडाने शोषू नये
झाडांची औषधं, तांत्रिक उपाय टाळावेत
सापाला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये
सर्पदंशाच्या बाबतीत अंधश्रद्धा आणि चुकीच्या उपचारांमुळे अनेकदा जीव धोक्यात येतो. त्यामुळे नागलोकवाला ‘गोल्डन रूल’ आणि ‘टाईम ट्रिक’ लक्षात ठेवून फक्त आणि फक्त वेळेत वैद्यकीय मदत घेणं हाच सर्वोत्तम उपाय आहे.