
मुंबई | माणदेश एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी :
क्रेडिट कार्ड देण्याच्या बहाण्याने एका वृद्ध दांपत्याची सव्वाचार लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची घटना खार परिसरात घडली आहे. जोसेफ जॉर्ज (वय ६७) व त्यांच्या पत्नीला टार्गेट करत सायबर भामट्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
घटनेची माहिती अशी की, ३० जुलै रोजी सकाळच्या सुमारास जोसेफ जॉर्ज यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. त्या व्यक्तीने स्वत:ला ‘एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत आहे’ असे सांगून, “तुम्ही नुकतेच क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असून, तुमचं वय जास्त असल्यामुळे कार्ड मिळवण्यासाठी दोन लाख रुपयांचं फिक्स डिपॉझिट (एफडी) करावं लागेल,” अशी माहिती दिली.
भामट्याच्या या खोट्या माहितीत भरवसा ठेवून जोसेफ जॉर्ज यांनी त्याला ओटीपी शेअर केला. काही वेळातच त्यांच्या खात्यातून प्रत्येकी ५० हजारांच्या चार हप्त्यांमध्ये एकूण दोन लाख रुपये डेबिट झाले. या रकमेचा विचार त्यांनी एफडीसाठी केल्यामुळे सुरुवातीला संशय आला नाही.
यानंतर, आरोपीने जोसेफ यांच्या पत्नीशीही संपर्क साधून त्यांना सुद्धा क्रेडिट कार्ड देतो, असे सांगत पुन्हा अशीच प्रक्रिया राबवली. परिणामी, एकूण रकमेचा फटका ४ लाख २७ हजार रुपयांवर गेला. जेव्हा जॉर्ज यांनी रकमेबाबत पुन्हा कॉल करून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संबंधित व्यक्तीने त्यांचे कॉल उचलणे बंद केले.
दरम्यान, जोसेफ जॉर्ज यांनी तात्काळ खार पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित फोन नंबरचा तपास सुरू केला असून, सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
फसवणुकीच्या वाढत्या घटना:
वृद्ध नागरिकांना लक्ष्य करून क्रेडिट कार्ड, केवायसी अपडेट, एफडी, किंवा बँक खात्याच्या नावाखाली OTP घेऊन आर्थिक फसवणुकीच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पोलिसांनी नागरिकांना वारंवार सुचना दिल्या असून, कोणालाही OTP, बँक डिटेल्स, डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती शेअर करू नका, असं आवाहन केलं आहे.