
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नंदूरबार/मुंबई
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नसतानाही महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये संघर्ष विकोपाला गेल्याचे चित्र आहे. नंदूरबारमधील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी शिंदे गटातील आमदारांवर थेट नाव घेऊन घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच महायुतीत अंतर्गत विसंवाद समोर आला आहे.
दोनच टार्गेट – रघुवंशी आणि पाडवी!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच डॉ. गावित यांनी जाहीर वक्तव्यात म्हटलं, “माझे फक्त दोनच टार्गेट आहेत – आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी. शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे.” हे वक्तव्य सार्वजनिकरित्या केल्यानंतर भाजप आणि शिंदे गट यांच्यातील मतभेद आणखी गहिरे झाले आहेत.
‘पाडवींकडे बारा बंगले… तरीही घरकुल योजनेचा गैरवापर’
डॉ. गावित यांनी आमदार आमश्या पाडवी यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटलं, “पाडवी यांच्याकडे स्वतःचे बारा बंगले आहेत आणि त्यांच्या पत्नीकडे चार बंगले आहेत. तरी देखील त्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे. शबरी आणि पीएम आवास योजनेंतर्गत त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावावर गैरप्रकार झाले आहेत.”
महायुतीत एकत्र लढणं आव्हानात्मक?
राज्यात महायुती (भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी – अजित पवार) आणि महाविकास आघाडी (ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गट) यांच्यात लढत अपेक्षित आहे. मात्र नंदूरबारसारख्या ठिकाणी भाजप-शिवसेना आमदारांमधील बेबनावामुळे महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा
राज्यात गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतो आहे.