३५ हजार मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटिसा; महापालिकेचा थकबाकी वसुली मोहिमेचा धडाका

0
49

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल ९४ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर थकबाकीच्या वसुलीसाठी सुमारे ३५ हजार मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात येत असून, थकीत मालमत्तांवर थेट जप्तीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी बुधवारी दिली.

महापालिकेच्या वतीने सध्या थकबाकीदारांवर धडक वसुली मोहिम राबवली जात असून, वेळोवेळी नोटिसा पाठवूनही कर न भरणाऱ्यांविरोधात आता थेट मालमत्ता जप्ती, नागरी सुविधा बंद करणे आणि थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांत जाहीर करण्याची तयारी सुरू आहे.


▶️ ५० हजारांवरील थकबाकीदारांची विशेष छाननी

२ हजारांहून अधिक मिळकतधारकांकडे ५० हजार रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कर थकीत आहे. या नागरिकांना विशेष स्वरूपाच्या जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या असून, यामध्ये अनेक व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.

३४ हजार १९५ मिळकतधारकांकडे ५ हजार रुपयांहून अधिक कर थकीत आहे. या सर्वांनाही नोटिसा देण्याचे काम सुरू असून, भागनिहाय पथके नेमून सूक्ष्म नियोजनाद्वारे वसुली मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.


▶️ नळ कनेक्शन तोडण्याचीही तयारी

फक्त मालमत्ता करच नव्हे, तर पाणीपट्टीच्या थकबाकीदारांवरही कारवाई होणार आहे. जर थकीत पाणीपट्टीची रक्कम एकरकमी भरण्यात आली, तर त्यावरील १०० टक्के व्याज व विलंबशुल्क माफ करण्यात येणार आहे.
या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून, नोटीसनंतरही थकबाकी न भरल्यास नळ कनेक्शन थेट तोडण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.


▶️ ६१ कोटींपेक्षा अधिक पाणीपट्टी थकबाकी

सन २०१९ मध्ये आलेला महापूर आणि त्यानंतर कोविड-१९ चा प्रादुर्भाव यामुळे महापालिकेचे प्रशासन व विभाग कामात गुंतल्याने पाणीपट्टी वसुली पूर्णपणे कोलमडली होती.
त्यामुळे मार्च २०२३ अखेरपर्यंत ४२.२८ कोटींची थेट पाणीपट्टी थकबाकी आणि १९.६२ कोटींचे विलंब शुल्क अशी एकूण ६१.९० कोटी रुपयांची रक्कम ग्राहकांकडे थकीत राहिली आहे.


▶️ विकासकामांवर परिणाम, आर्थिक अडचणी वाढल्या

महापालिकेच्या या वाढत्या थकबाकीमुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा, दुरुस्ती आणि देखभालीसाठी लागणारा खर्च भागवताना आर्थिक तंगी जाणवू लागली आहे.
यामुळेच एकरकमी वसुली करून महसूल वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून हे कडक पावले उचलण्यात येत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here