
माणदेश एक्सप्रेस न्यूज | दिल्ली
येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीसंदर्भात चर्चा झपाट्याने वाढल्या असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर खुलं वक्तव्य केलं आहे.
राज ठाकरेंबाबत ठाम भूमिका
“आम्ही दोघं भाऊ सक्षम आहोत. जे करायचं ते आम्ही स्वतः ठरवू. यासाठी तिसऱ्या कोणाचं मध्यस्थीची गरज नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांना अधिकृत स्वरूप देण्यासारखं विधान केलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एका मंचावर आले असून, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा कलाटणीचा संकेत मिळतोय. युतीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी, ठाकरे बंधूंच्या हालचालींमुळे सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
इंडिया आघाडी बैठकीत सहभाग
उद्धव ठाकरे हे सध्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांसमवेत बैठक घेतली. यानंतर ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्नेहभोजनालाही उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना (ठाकरे गट) खासदारांचीही स्वतंत्र बैठक होणार आहे.
सरकारच्या परराष्ट्र नीतीवर घणाघात
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली. “अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींवर खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना प्रत्युत्तर देत नाही. हे सरकार परराष्ट्र नीतीत पूर्णतः अपयशी ठरले आहे. चीन आणि पाकिस्तानप्रती लाचारीची भूमिका ही देशासाठी धोकादायक आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी यावेळी मोदी सरकारला ‘प्रचार मंत्री’ सरकार असं संबोधत, “पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान बिहारात प्रचारात व्यस्त होते. सच्चा देशभक्त देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देतो,” असा आरोप केला.
शेतकरी आंदोलनावरूनही सरकारवर टीका
“दोन-तीन वर्षांपूर्वी शेतकरी दिल्लीत आंदोलन करत होते. त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, काही शेतकरी मृत्युमुखी पडले. त्यावेळी सरकार गप्प का होतं? तेव्हा ‘शेतकऱ्यांची मुलं आहोत’ असं म्हणणारे आज कुठे आहेत?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
पाकिस्तान आणि IPLवरून सवाल
“आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये असं नेहमी म्हणालो. जय शहांची मुले मात्र दुबईत जाऊन पाकिस्तानची मॅच पाहतात. मग हेच देशभक्त का ठरतात? देशभक्तीची व्याख्या भाजपला परवडणारी असते,” असं म्हणत त्यांनी भाजप नेतृत्वावर थेट टीका केली.
राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेने राज्यात नवा राजकीय समीकरण तयार होऊ शकतो. शिवसेना (ठाकरे गट), मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) एकत्र आल्यास महाविकास आघाडीला नवसंजीवनी मिळू शकते.
उद्धव ठाकरे यांचे आजचे वक्तव्य ही याच दिशेने एक पाऊल असल्याचे राजकीय जाणकार मानत आहेत.