आनंदाची बातमी: ‘माधुरी’ लवकरच नांदणी मठात परतणार! कोल्हापुरात परतीचा मार्ग अखेर मोकळा

0
87

माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर

कोल्हापूरकरांसाठी आणि नांदणी मठाच्या भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडलेली आणि वनतारा (वन्य प्राणी उपचार व पुनर्वसन केंद्र) कडून हटवलेली ‘माधुरी’ ही हत्तीण लवकरच पुन्हा नांदणी मठात परतणार आहे. या निर्णयाने नांदणी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बैठकीत निर्णायक घडामोडी

माधुरीच्या परतीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेली बैठक नांदणी मठ व वनतारा (वन्य प्राणी उपचार व पुनर्वसन प्रकल्प) चे सीईओ यांच्यात नुकतीच पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळेच मार्ग मोकळा झाला, असे अधिकृत सूत्रांकडून समजते. वनताराच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारसोबत पक्षकार म्हणून सामील होण्यास तयार असल्याचे मान्य केले. त्याचबरोबर नांदणी मठाच्या परिसरातच माधुरीसाठी स्वतंत्र पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारीही वनताराने दर्शवली आहे.

राजकीय पाठिंबाही निर्णायक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील यात सक्रीय सहभाग घेत, “माधुरीवर कोणतेही उपचार करायचे असतील तर ते नांदणी मठातच करा”, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आणि वनताराच्या भूमिकेला वळण लागले. याआधी अनेक सामाजिक, धार्मिक संस्था, सामान्य जनता, व प. महाराष्ट्रातील कार्यकर्ते माधुरीच्या परतीसाठी एकवटले होते.

वनताराची माफी आणि भूमिका स्पष्ट

वनताराने नुकताच एक पत्रक प्रसिद्ध करत कोल्हापूरकरांची आणि मठ व्यवस्थेची माफी मागितली. या पत्रात म्हटले आहे की,

“माधुरी कोल्हापुरातच राहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त व मठाच्या नेत्यांच्या भावना आम्हाला पूर्णपणे मान्य आहेत. माधुरीच्या परतीसाठी सुप्रीम कोर्टात सरकार आणि मठ व्यवस्थापनाने केलेल्या अर्जाला वनतारा पूर्णपणे साथ देईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व तांत्रिक आणि वैद्यकीय मदत आम्ही देऊ. आमच्यामुळे कोणीही दुखावले गेले असेल तर आम्ही माफी मागतो.”

या पत्रकातून वनताराने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली असून, संपूर्ण प्रकारात सहकार्याची तयारी दर्शवली आहे.

आंदोलनाचा यशस्वी शेवट

माधुरी हत्तीणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन सुरु होते. मठातील साधू-संत, स्थानिक भक्तगण, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी आणि हत्तीप्रेमींनी एकत्र येऊन जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला. अखेर हे आंदोलन यशस्वी ठरले आणि माधुरीच्या परतीचा मार्ग अधिकृतरीत्या मोकळा झाला.

पुढील टप्पा : सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि पुनर्वसनाची अंमलबजावणी

माधुरीच्या परतीसाठी सुप्रीम कोर्टात जो प्रस्ताव सादर करण्यात आला आहे त्यावर अंतिम निर्णय येणे बाकी आहे. मात्र वनतारा आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून हे काम मार्गी लावण्याची तयारी दर्शवली आहे. नांदणी मठालगतच माधुरीसाठी स्वतंत्र पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देखील येत्या काही दिवसांत साकार होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here