
माणदेश एक्सप्रेस न्यूज | प्रतिनिधी
२९ ऑगस्टला मुंबईकडे निर्णायक मोर्चा, ‘एक घर, एक गाडी’ आंदोलन
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला मुंबईकडे निर्णायक मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. “असा समुद्र मराठ्यांना कधीच बघायला मिळणार नाही, या लढ्याचे तुम्ही साक्षीदार व्हा,” असे आवाहन करत त्यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले, “२७ ऑगस्टपर्यंत जर आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर कोणत्याही मंत्र्याचे ऐकणार नाही. सर्व पक्षातील नेत्यांना मी आवाहन करतो की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, लेकरांच्या भवितव्यासाठी तुम्ही मुंबईला या. आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय या वेळी परतणार नाही.”
‘एक घर, एक गाडी’ मोहीम
मुंबई मोर्चासाठी ‘एक घर, एक गाडी’ ही मोहीम राबवण्यात येत असून धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून मराठा बांधवांशी संवाद सुरू आहे. सोलापूरनंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांत सभा घेण्यात येणार आहेत.
“ज्यांची नोंद झाली आहे, त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं. आम्ही शांततेत जाणार आणि शांततेतच परतणार, पण आरक्षणाशिवाय परतणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाच हजार टँकर, शांततेचा निर्धार
मोर्चासाठी ५ हजार पाण्याचे टँकर लागणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी मराठा बांधवांना शांततेचं आवाहन केलं आहे. “सरकारने आपली माणसं आंदोलनात घुसवली, तरीही एक इंच मागे सरायचं नाही. कुठेही जाळपोळ, दगडफेक करायची नाही,” असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
शिवनेरी मुक्काम, ऐतिहासिक मार्ग
मुंबई मोर्चासाठी अंतरवाली सराटी येथून सकाळी १० वाजता निघून शिवनेरी, चाकण, राजगुरूनगर, लोणावळा आणि आझाद मैदानमार्गे मार्गक्रमण करण्यात येईल. “शिवनेरीचा पहिला मुक्काम असेल. लहान मुलांचे हाल होणार असल्यास मार्ग बदलू,” असेही त्यांनी नमूद केले.
मागण्या आणि सरकारवर टीका
जरांगे पाटील म्हणाले, “सरकारकडे ५८ लाख कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, मग जीआर काढायला अडचण काय? मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश निघेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.”
“हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट, बॉम्बे अनुसंस्था गॅझेट आम्ही घेऊन जाणार आहोत. गेल्यावेळी फसवणूक झाली, यावेळी ती होऊ द्यायची नाही. आमचं आरक्षण, आमचा हक्क आम्हाला हवा आहे,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.
‘तीन वर्षांचा संयम संपला’
“गेल्यावेळी आम्ही सगे-सोयऱ्याच्या अध्यादेशाच्या आश्वासनाला भुललो. सरकारला तीन वर्षांचा वेळ दिला, इतका संयम कोणी दाखवत नाही. आता ही आरपारची लढाई आहे.” अशा शब्दांत त्यांनी आंदोलनाचा निर्णायक टप्पा जाहीर केला.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता २९ ऑगस्टच्या ‘चलो मुंबई’ आंदोलनाकडे लागले आहे. मराठा समाजाचा समुद्र राजधानीत धडक देणार असून, त्याआधी राज्य सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.