चिपरीत भर रस्त्यात युवकाचा खून; हल्लेखोर फरार, CCTV फूटेजवरून शोध सुरू

0
142

माणदेश एक्सप्रेस न्यूज | जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) सकाळी साडेआठच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. सांगली-कोल्हापूर महामार्गावर चिपरी फाट्याजवळ एका २२ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव संदेश लक्ष्मण शेळके (वय २२, रा. चिपरी) असे आहे.

बहिणीला सोडून परतताना झाला घात

संदेश शेळके बुधवारी सकाळी मोपेडवरून बहिणीला सोडून परत आपल्या घरी जात होता. त्याच दरम्यान चिपरी फाट्यानजीक दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार हत्याराने मानेवर, पाठीवर वर्मी घाव घालण्यात आले. या दगडाफेक आणि धारधार हत्याराच्या हल्ल्यात संदेशचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी

घटनेनंतर काही क्षणांतच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडलेला होता. तरुणाचा मृतदेह अत्यंत भयावह अवस्थेत पडलेला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांची पाहणी आणि तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

CCTV फूटेजवरून हल्लेखोरांचा शोध

हल्लेखोरांनी योजून केलेला हा हल्ला असून, यामागे पूर्ववैमनस्य की इतर कोणते कारण आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याचे विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. हल्लेखोर कोण आणि नेमकी कोणत्या कारणाने ही थरारक घटना घडवली, याचा शोध घेतला जात आहे.

परिसरात तणावाचे वातावरण

हा खून दिवसाढवळ्या, गर्दीच्या भागात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी चिपरी आणि आजूबाजूच्या परिसरात गस्त वाढवली असून हल्लेखोर लवकरच सापडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here