EMI कपात थांबली! RBI चा रेपो दर ‘जैसे थे’, ट्रम्प यांच्या टॅरिफ खेळीचा परिणाम?

0
44

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीने ऑगस्ट महिन्यात ग्राहकांना अपेक्षित दिलासा न देता रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे घरकर्ज, वाहन कर्ज घेणाऱ्यांना EMI कपातीतून यंदा काहीही फायदा मिळणार नाही. रेपो दर 5.50 टक्क्यांवर जैसे थे ठेवण्यात आला आहे.

 

1% कपातीनंतर पहिल्यांदाच ब्रेक

फेब्रुवारी 2025 पासून RBI ने तीन टप्प्यांत रेपो दरात 1 टक्क्यांची कपात केली होती. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये प्रत्येकी 0.25 टक्के तर जूनमध्ये मोठी 0.50 टक्क्यांची कपात झाली होती. यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर आला. मात्र ऑगस्टमध्ये ही साखळी तुटली असून RBI ने दर यथास्थित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम?

RBI च्या निर्णयावर जागतिक घडामोडींचाही प्रभाव दिसून आला. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे RBI पुढे सावध भूमिका घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पतधोरण समितीपुढे स्पष्ट प्रश्न होता – ‘दर कपात करावी की स्थगित ठेवावी?’

 

महागाई नियंत्रणात, तरीही EMI कपात नाही!

जून महिन्यात किरकोळ महागाई दर 77 महिन्यांच्या नीचांकावर पोहोचला असून ही सरकारसाठी दिलासादायक बाब आहे. तरीदेखील RBI ने या महागाईच्या आकड्यांपेक्षा जागतिक परिस्थितीवर भर देत दर कपात टाळली आहे. जुलैमधील महागाईची आकडेवारी समितीसमोर नसल्यानेही निर्णयावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

 

ग्राहकांचा हिरमोड, रिअल इस्टेटला झटका

RBI च्या या निर्णयामुळे दिवाळीपूर्वी घरखरेदी करणाऱ्यांसाठी EMI कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. रिअल इस्टेट व वाहन बाजाराला जोर येईल अशी आशा बांधली जात होती. मात्र EMI कमी न झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला असून बाजारात साशंकता आहे.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here