
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई – ६ ऑगस्ट २०२५
दादरमधील कबूतरखान्यावर महापालिकेकडून ताडपत्री टाकण्यात आल्याने आज सकाळी परिसरात मोठा गोंधळ उडाला. जैन समाजाच्या नागरिकांनी आक्रमक होत कबूतरखान्याच्या आवारात प्रवेश करत आंदोलन छेडले. महिलांनी ताडपत्री फाडून कबूतरांना अन्न टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली, ज्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.
या संपूर्ण प्रकरणावर आता राज्यमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाष्य करत एक मोठा दावा केला आहे. “हे जे काही सकाळी घडलं, ते अत्यंत चुकीचं होतं. मी ट्रस्टच्या विश्वस्तांशी चर्चा केली असून त्यांचं म्हणणं आहे की, हे कृत्य बाहेरील लोकांनी केलं. ट्रस्टचा आणि जैन समाजाच्या मुख्य प्रवाहाचा यामध्ये काही संबंध नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
लोढा पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनांनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं होतं आणि आम्ही समाधानी होतो. पण अचानक सकाळी काही लोकांनी कायदा हातात घेतला, त्याविषयी आम्ही खेद व्यक्त करतो.” तसेच, लोकांनी शांतता राखावी आणि उद्याच्या कोर्टाच्या निर्णयाची वाट पहावी, असंही त्यांनी आवाहन केलं.
दरम्यान, आंदोलकांनी केलेल्या कृतीमुळे कबूतरांचे देखील नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. “ट्रस्टमधील कोणीही यामध्ये सहभागी नव्हतं, हे स्पष्ट करतो. बाहेरून आलेले लोक नक्की कोण होते, हे अजून स्पष्ट झालेलं नाही,” असंही लोढा यांनी नमूद केलं.
पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून उद्याच्या कोर्टाच्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
मुंबईत धार्मिक समजुती आणि कायदा या दोहोंमध्ये संतुलन राखणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान ठरत आहे.