
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सोलापूर :
सोलापूर शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. डीजेवर देहभान विसरून नाचत असलेल्या अभिषेक बिराजदार या तरुणाचा डान्सच्या काही क्षणांतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना घडली आणि काही वेळातच सोलापूर शहरभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाचत होता, थांबला… आणि क्षणात कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक एका कार्यक्रमात डीजेच्या तालावर आनंदात नाचत होता. त्याचे नाचतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. उत्साहात नाचत असताना तो अचानक काही क्षण बाजूला थांबला आणि क्षणातच जमिनीवर कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत्यूची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अभिषेकच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली असून, त्याचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
डान्सचा शेवटचा क्षण व्हायरल
या घटनेत विशेष म्हणजे अभिषेकचा डीजेवर नाचतानाचा शेवटचा क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला होता. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतो आहे. व्हिडीओमध्ये अभिषेक बेभान होऊन नाचताना दिसतो आणि काही क्षणांतच बाजूला जाऊन उभा राहतो. त्यानंतरचा काळ हृदय पिळवटून टाकणारा आहे.
पुन्हा डीजेच्या आवाजावर प्रश्नचिन्ह
अभिषेकच्या निधनामुळे कर्णकर्कश्य डीजेच्या आवाजावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. उच्च आवाज, प्रखर लाइट्स आणि तासंतास सुरू राहणारा संगीताचा मारा याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, यावर आता विचारमंथन होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.