
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई/कोल्हापूर :
महादेवी हत्तीणीच्या परतीसंदर्भात कोल्हापूरकरांनी सुरू केलेल्या लढ्याला अखेर यशाची किनार मिळण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हत्तीण परत आणण्यासाठी सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महादेवीसाठी धगधगत असलेला जनआंदोलना आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
“हत्तीण परत यावी, ही आपली सामूहिक भावना” – मुख्यमंत्री
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महादेवी हत्तीण गेल्या 34 वर्षांपासून नांदणी मठात आहे. तिचं स्थान हे केवळ धार्मिक नाही, तर कोल्हापूरच्या जनतेच्या भावविश्वाचाही भाग आहे. हत्तीण परत यावी, ही सर्वांची भावना आहे आणि सरकार त्या दिशेने सकारात्मक भूमिका घेणार आहे.”
सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका
महत्त्वाचं म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सुचवलं की, नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, आणि राज्य सरकारसुद्धा त्या याचिकेत पाठिंबा देत स्वतंत्र याचिका दाखल करेल. याचिकेमध्ये सरकार हत्तीणीच्या देखभालीसाठी आवश्यक उपाययोजना, वैद्यकीय सुविधा, आहार, रेस्क्यू सेंटरसारख्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाला आश्वस्त करेल.
डॉक्टरांची खास टीम
महादेवी हत्तीणीच्या निगेसाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांची विशेष टीम नेमली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या टीममार्फत हत्तीणीच्या आरोग्याची सतत तपासणी केली जाईल आणि तिच्या पुनर्वसनासाठी आवश्यक उपाय योजले जातील.
बैठकीला राजकीय नेत्यांची मोठी उपस्थिती
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर यांच्यासह राजू शेट्टी, सतेज पाटील, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने यांसारखे अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नांदणी मठाचे प्रतिनिधी देखील यावेळी सहभागी झाले होते.
राजू शेट्टी यांची भूमिका ठाम
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, “महादेवी हत्तीण परत आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकारची भूमिका समाधानकारक आहे, पण कृती त्वरित झाली पाहिजे. कोल्हापूरकरांच्या भावना गांभीर्याने घ्या.”
पार्श्वभूमी
गेल्या काही दिवसांपासून महादेवी हत्तीणीला गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पात हलवण्यात आल्यामुळे कोल्हापुरात तीव्र संताप होता. अनेकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावरून जिओच्या सेवा आणि इंधनावरही बहिष्कार टाकण्यात आला होता. सोशल मीडियावरही या मुद्द्याने मोठी लाट उसळवली होती.