
माणदेश एक्सप्रेस न्यूज, मीरारोड
मुंबईत कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्द्यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने विविध भागांतील कबूतरखाने हटवण्याची मोहीम राबवली आहे. मात्र, प्राणीप्रेमी आणि जैन समाजातील काही नागरिक या कारवाईला विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी मीरारोडमध्ये कबूतरांना खाणं टाकू नका, असे सांगितल्याच्या कारणावरून संतापून वृद्ध आणि त्यांच्या मुलीवर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
काय घडलं नेमकं?
रविवारी सकाळी मीरारोड येथील ठाकूर मॉलजवळील डीबी ओझोन इमारतीमध्ये महेंद्र पटेल (वय 69) हे दूध आणून घरी परतत असताना त्यांना शेजारी राहणारी आशा व्यास ही महिला कबूतरांना दाणे टाकताना दिसली. पटेल यांनी तिला सांगितले की, महानगरपालिकेच्या नियमांनुसार आणि न्यायालयाच्या आदेशामुळे कबूतरांना खाणं देणे प्रतिबंधित आहे, त्यामुळे खाणं टाकू नये.
या सूचनेवरून आशा व्यास संतापली आणि महेंद्र पटेल यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. त्यांचा आवाज ऐकून पटेल यांची मुलगी प्रेमल पटेल खाली आली आणि तिने आशा व्यास यांना जाब विचारला. इतक्यात व्यास यांच्या इमारतीत राहणारा सोमेश अग्निहोत्री दोन साथीदारांसह घटनास्थळी आला आणि त्याने थेट प्रेमल पटेल यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. दुसऱ्या व्यक्तीने प्रेमल पटेल यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रेमल आणि तिचे वडील दोघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेनंतर महेंद्र पटेल यांनी तक्रार दाखल केली असून, काशीमीरा पोलीस ठाण्यात सोमेश अग्निहोत्री, आशा व्यास आणि इतर दोन जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पार्श्वभूमी – कबूतरखाने बंद करण्याचा वाद
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने दादर कबूतरखाना तसेच शहरातील इतर कबूतरखाने हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे परिसरातील स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या प्रश्नांवर उपाययोजना केली जात आहे. मात्र, या निर्णयाला जैन समाज व काही प्राणीप्रेमींनी विरोध दर्शवला असून, ते या कारवाईविरोधात आंदोलन करत आहेत.
या पार्श्वभूमीवर मीरारोडमधील ही हिंसक घटना घडल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसह जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना असून, कबूतरांना खाणं टाकण्याच्या निषिद्ध कृतीवरून असा संघर्ष होणे, हे निश्चितच गंभीर आणि धोकादायक आहे.