
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान करत आगामी राजकीय घडामोडींना चालना दिली आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी मराठी भाषेच्या प्रचाराचा आग्रह धरत हिंदी भाषिकांबाबत द्वेष टाळण्याचा सल्ला दिला. याच वेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोबत संभाव्य युतीबाबतही महत्त्वाचे वक्तव्य केले.
राज ठाकरे म्हणाले, “यंदा मनसे महापालिकेवर १०० टक्के सत्तेत येणार आहे.” त्यांच्या या विधानामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्या वॉर्डमध्ये तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले असून अंतर्गत गटबाजी थांबवून एकजुटीने मैदानात उतरण्याचं आवाहन केलं.
मराठीचा अभिमान, पण द्वेष नको – ठाकरेंचा स्पष्ट संदेश
या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मराठी भाषेसाठी मनसेने घेतलेली भूमिका प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. पण हे करताना कोणत्याही हिंदी भाषिकांचा द्वेष होऊ नये. आपली अस्मिता सकारात्मकपणे मांडली पाहिजे.”
त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना स्थानिक समस्या ओळखून त्यांच्या समाधानासाठी थेट जनतेत उतरून काम करण्याचे निर्देश दिले. “तुमच्यातल्या मतभेदांपेक्षा पक्षाचं मोठं उद्दिष्ट लक्षात ठेवा. निवडणुकीचे काम एकदिलाने करा,” असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
शिवसेना (ठाकरे गट) सोबत युतीबाबत सूचक विधान
यावेळी माध्यमांमध्ये गाजत असलेल्या मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीबाबत विचारण्यात आलं असता, राज ठाकरे यांनी म्हणाले, “ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काय करायचं ते माझ्यावर सोडा. योग्य वेळी मी स्वतः स्पष्ट बोलेन. आताच कोणतीही भूमिका घेऊ नका, फक्त माझ्या आदेशाची वाट पाहा.”
या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना मुंबईतील राजकीय गणितं कशी जमणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.