
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जनविश्वास सप्ताह’ अंतर्गत आज सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवकांसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली.
हा मेळावा आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तरुणांना सामाजिक, राजकीय पातळीवर सक्रिय करण्यासाठी ‘युवा संवाद मेळावा’ घेण्यात येत आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत युवकांना प्रेरणा देणे, स्थानिक नेतृत्व विकसित करणे, सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणे आणि विधायक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे. यापूर्वीही युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून वृक्षारोपण, विक्रमी रक्तदान शिबिर आदी उपक्रम यशस्वी करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या संवाद मेळाव्यास सांगली जिल्ह्यासह आटपाडी तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अनिल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. युवाशक्तीला दिशा देणारा हा मेळावा युवकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.