धावत्या एसटी बसमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला! अर्धवट कपड्यात, अनवाणी पायाने पळून जाण्याचा प्रयत्न; पोलिसांनी शिताफीने पकडलं

0
141

माणदेश एक्सप्रेस न्यूज | इंदापूर

बारामतीहून इंदापूरच्या दिशेने निघालेल्या एसटी बसमध्ये एका तरुणाने कोयत्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील काटेवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी घडली. बसमधील मागच्या सीटवर बसलेल्या तरुणावर शेजारील प्रवाशाने अचानक बॅगेतून कोयता काढून सपासप वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून आरोपीने स्वतःवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
कोयत्याचा झटका बसमध्ये!

 

सकाळी बारामतीहून इंदापूरला जाणारी इंदापूर आगाराची एसटी बस काटेवाडी परिसरात पोहोचली असताना अचानक मागच्या सीटवर बसलेल्या एका तरुणावर शेजारी बसलेल्या इसमाने कोयत्याने हल्ला चढवला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण बसमध्ये गोंधळ उडाला. भर बसमध्ये कोयत्याचा वापर करत जीवघेणा हल्ला केल्याने महिला, वृद्ध व इतर प्रवासी घाबरून गेले.

 

स्वतःवरही हल्ला करण्याचा प्रयत्न

हल्ल्यानंतर आरोपीने कोयत्याने स्वतःच्या गळ्यावर वार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तत्परतेने हस्तक्षेप करणाऱ्या प्रवाशांनी त्याला थांबवले. जखमी झालेला तरुण काटेवाडीतच बसमधून उतरून जखमी अवस्थेत निघून गेला.

 

पोलिसांची तत्पर कारवाई

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी धावले. आरोपी तरुण अर्धवट कपड्यात, अनवाणी पायाने हातात कोयता घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. या घटनेचा आणि पोलिस कारवाईचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

हल्ल्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात

आरोपीला ताब्यात घेतल्यावर पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसून येते. मात्र हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपीच्या वैद्यकीय तपासणीसह पाश्र्वभूमीचीही चौकशी केली जात आहे.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here