
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे –
एकनाथ खडसेंच्या जावयाच्या रेव्ह पार्टीतील अटकेनंतर राजकीय वर्तुळात निर्माण झालेल्या प्रचंड गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली असून, पुण्यातील एका महिला नेत्या रूपाली चाकणकर यांना थेट इशारा दिला आहे.
पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टीदरम्यान एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत सात जणांना पकडण्यात आले असून, या पार्टीत कोकेन, गांजा आणि मोठ्या प्रमाणात मद्य जप्त करण्यात आले होते. यानंतर विरोधकांनी खडसे कुटुंबावर सडकून टीका केली.
या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “मी एक वकील म्हणून प्रांजल खेवलकरला भेटण्यासाठी सीपी कार्यालयात गेले होते. त्यांच्याकडून मला काही महत्त्वाची माहिती हवी होती. याचवेळी सीपी साहेबही उपस्थित होते, म्हणून त्यांचीही भेट घेतली.”
रूपाली चाकणकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहिणी खडसे म्हणाल्या, “करू द्या मग टीका, योग्य वेळी प्रत्युत्तर देईन.” तसेच, “पोलिसांनी स्वतः सांगितले की पाळत ठेवणे हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते. आम्हाला भेट घेऊन त्यांनी हे स्पष्ट केलं,” असंही त्या म्हणाल्या.
प्रांजल खेवलकरला अटक होऊन तब्बल २४ तास उलटल्यानंतर रोहिणी खडसेंनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. याआधी त्यांनी केवळ सोशल मीडियावर एक पोस्ट करत, “सत्य लवकरच बाहेर येईल,” असा संदेश दिला होता. त्यात त्यांनी पतीचा फोटोही शेअर केला होता.
सध्या प्रांजल खेवलकर न्यायालयीन कोठडीत असून, लवकरच जामिनासाठी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबत कोर्टात सुनावणी होणार असून, त्यावेळीही रोहिणी खडसे उपस्थित राहतील.
या प्रकरणामुळे केवळ खडसे कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण विरोधकांवर राजकीय दबाव निर्माण झाला असून, विरोधकांवरील पोलिसी कारवाईमुळे राजकीय हेतू असल्याचा आरोपही केला जात आहे.