
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पिंपरी-चिंचवड –
पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथे घडलेल्या धक्कादायक दरोड्याचा पुणे पोलिसांनी यशस्वी तपास केला असून, चक्क मोबाईलऐवजी वॉकी-टॉकी वापरून दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तब्बल 1200 किमी पाठलाग करून आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली असून, एक स्थानिक आरोपी तळेगावमधून जेरबंद करण्यात आला आहे.
घडली होती 6.15 लाखांची लूट
19 जुलै रोजी, पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात एका उद्योजकाच्या घरात टोळीने घुसखोरी करत त्यांचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली आणि पिस्तूलाचा धाक दाखवत तब्बल 6 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. यामध्ये सोन्याचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम यांचा समावेश होता.
वॉकी-टॉकी वापरून चुकवला ट्रॅकिंगचा सापळा
या टोळीने मोबाईलऐवजी वॉकी-टॉकीचा वापर करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मोबाईल ट्रेस होऊ नये यासाठी त्यांनी ही अनोखी शक्कल लढवली होती. मात्र पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे त्यांचा हा डाव फसला.
पोलिसांचा 1200 किमीचा पाठलाग – जयपूरमध्ये पकड
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास करत जयपूरमधून मुख्य आरोपी सुरेश ढाका आणि त्याचा साथीदाराला अटक केली. तसेच स्थानिक आरोपी हिपाल विष्णोई याला तळेगावमधून पकडण्यात आले.
मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त
या गुन्ह्यातून पोलिसांनी मारुती स्विफ्ट कार, 4 वॉकी-टॉकी, सोन्याचे दागिने, बनावट नंबर प्लेट, मोबाईल फोन, आधारकार्ड, RC बुक आदी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी – 21 गंभीर गुन्ह्यांची नोंद
हे आरोपी राजस्थान आणि गुजरातमध्ये पूर्वीपासून खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी यासारख्या 21 गंभीर गुन्ह्यांत गुंतलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीत एक महिला आणि इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे व लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.