
माणदेश एक्सप्रेस न्यूज |
राज्यात नवे कृषीमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. मात्र मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच वाद पेटला आहे. “वाकडं काम करून ते नियमात बसवतो” या त्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
कोकाटेंची उचलबांगडी, भरणेंची नियुक्ती
इंदापूरचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे दत्तात्रय भरणे यांना कृषीमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्री पदावरून उचलबांगडी करत त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली. ओसाड गावच्या पाटीलकीवरून निर्माण झालेल्या वादानंतर कोकाटेंच्या बदल्याच्या हालचाली झडल्या आणि त्या पार्श्वभूमीवर भरणेंची नियुक्ती करण्यात आली.
वादग्रस्त विधानाची ठिणगी
नवीन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल विषयक एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की –
“कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात. पण वाकडं काम करून पुन्हा ते नियमात बसवतो, त्याची माणसं, लोक नोंद ठेवतात.”
या विधानामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मंत्रिपदाची कारकीर्द सुरू होताच केलेल्या या विधानामुळे कृषी विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणार की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
विरोधकांचा हल्लाबोल
भरणे यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी तीव्र टीका केली आहे.
“तुमचं हे पहिलंच वक्तव्य आहे आणि तेच घातक आहे. वाकडं काम करायचं, आणि नंतर ते नियमात बसवायचं हे मंत्रीपदाचा उपयोग चुकीच्या पद्धतीने होतोय असं दिसतंय. अनेक नेत्यांनी अशा वेडवाकड्या कामांनी राज्याच्या तिजोरीचा शस्त्रक्रियेसारखा वेध घेतलाय. अशा नेत्यांची संपत्ती ताडासारखी सरळ वाढलेली आहे. भरणे मामा, हे लक्षात ठेवा – तुम्हाला हे पद वाकडं काम करण्यासाठी दिलेलं नाही,”
असा थेट इशारा रोहित पवारांनी दिला आहे.
‘मामावर लक्ष ठेवलं जाईल’ – विरोधकांची ताकीद
विरोधकांनी भरणे यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की आता कृषी खाते म्हणजे शेतकऱ्यांच्या आशेचं केंद्रबिंदू आहे आणि त्यामध्ये जर “वाकडी कामं” झाली, तर त्याचा जाब विचारला जाईल.
“तुम्ही बोलून गेलात की वाकडं काम केलं तरी चालतं. पण आम्ही सांगतो की, आता जर खरंच वाकडं काम झालं, तर महाराष्ट्र माफ करणार नाही आणि आम्ही सोडणार नाही.”
अशा शब्दांत विरोधकांनी भरणे यांना जाहीर इशारा दिला आहे.