
माणदेश एक्सप्रेस न्यूज, आटपाडी | 01 ऑगस्ट 2025
पंचायत समिती, आटपाडी कार्यालयात माहिती अधिकाराच्या मागणीवरून गट शिक्षण अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संतोष सुखदेव हेगडे (रा. आवळाई, ता. आटपाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भादंवि कलम 132, 352, 351(2)(3) नुसार हे प्रकरण नोंदविण्यात आले आहे. फिर्यादी मयूर हनुमंत लाडे (वय 32), गट शिक्षण अधिकारी, सध्या रा. आटपाडी, यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घटना कशी घडली?
30 जुलै 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता ही घटना पंचायत समितीच्या कार्यालयात घडली. आरोपी संतोष हेगडे हा माहिती अधिकाराअंतर्गत काही दस्तऐवज घेण्यासाठी आला होता. मात्र त्यांनी अर्जात नमूद नसलेली माहिती मागितली. यावर गट शिक्षण अधिकारी लाडे यांनी योग्य कार्यपद्धतीनुसार “स्वतंत्र अर्ज सादर करा” असे सांगितले. त्यानंतर आरोपीने अचानक आक्रमक वर्तन करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तो फिर्यादीच्या अंगावर धावून आला व हात उगारत धमक्या देऊ लागला. तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
त्याने कार्यालयातील कागदपत्रे हिसकावून घेतली आणि गट शिक्षण अधिकाऱ्याला खुर्चीतून उठवून त्यांचा व्हिडिओ चित्रीकरण केला. त्याचप्रमाणे दुसरे अधिकारी अशोक विनायक म्हेत्रे (शिक्षण विस्तार अधिकारी) यांनाही उभे करून त्यांचा देखील व्हिडिओ शूट केला. हे सर्व प्रकार अधिकाऱ्यांना अपमानित करत त्यांचे शासकीय कामकाज थांबवण्यासाठी केले गेले.
तपास सुरु
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक करंजकर तपास करत आहेत. आरोपीचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. तसेच या घटनेमागे कोणताही राजकीय हेतू किंवा संघटित गुन्हेगारीचा सहभाग नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही अद्याप नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.