
माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर –
श्री क्षेत्र जोतिबाच्या श्रावण षष्ठी यात्रेदरम्यान मोठा गैरप्रकार समोर आला आहे. यात्रेत विक्रीसाठी आणलेली तब्बल ४०० किलो भेसळयुक्त बर्फी, पेढे आणि हलवा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केली असून या मिठाईची अंदाजित किंमत एक लाख रुपये आहे. भाविकांच्या श्रद्धेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रकारे खेळ झाल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
या प्रकाराची माहिती जोतिबा ग्रामपंचायतचे सदस्य सुनील नवाळे आणि अधिकारी विठ्ठल भोगण यांनी अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचूपते यांना दिली. यात्रेतील एका दुकानात विक्रीसाठी ठेवलेली मिठाई संशयास्पद वाटत असल्याने तातडीने तपासणी केली असता, डफळापूर येथील व्यापाऱ्याकडून आलेल्या मिठाईत भेसळ असल्याचे निष्पन्न झाले.
सदर मिठाई १०० रुपये पावशेर दराने विकली जात होती. तपासणीनंतर संपूर्ण मिठाईचा पंचनामा करून ग्रामपंचायत कार्यालयातून थेट डंपिंग ग्राऊंडवर नेऊन नष्ट करण्यात आली. ही कारवाई वेळेत न झाल्यास लाखो भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असता.
या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तात्काळ दखल घेतली असून, त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला इतर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापुरातील विविध तीर्थक्षेत्रांना दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या घटकांवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.