
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरु आहे. एकीकडे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीगाठींमुळे त्यांच्या कमबॅकची शक्यता अधिकच बळावली होती. मात्र या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात पूर्णविराम दिला.
धनंजय मुंडे यांना कृषी खात्यातील भ्रष्टाचार प्रकरणी नुकतीच न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या राजकीय हालचालींना गती देत गेल्या काही दिवसांत अजित पवार आणि फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळेच त्यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन निश्चित असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. याच दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलून त्यांना क्रीडा मंत्रालय देण्यात आले, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले. त्यामुळेच मंत्रिमंडळात रिक्त झालेल्या जागेवर मुंडेंची वर्णी लागणार का, हा प्रश्न उपस्थित झाला होता.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “धनंजय मुंडे यांनी माझी तीन वेळा भेट घेतली, पण त्या भेटी मंत्रिमंडळाबाबत नव्हत्या. मंत्रिमंडळाबाबत चर्चा ही मी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर होते. त्या चर्चेत मुंडे सहभागी नाहीत.”
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मुंडेंच्या कमबॅकबाबतचे तर्क-युक्ती संपुष्टात आले आहेत. मात्र अजूनही त्यांच्या समर्थकांमध्ये आशेचा किरण जिवंत आहे. कारण क्लीनचीट मिळालेली असूनही अजून निर्णय थांबलेला आहे, त्यामुळे ‘वेट अँड वॉच’ स्थिती कायम आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या पुनरागमनाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांमध्ये मुंडेंचं नाव किती वेळा येईल आणि ते परत येणार का, यावर सध्या तरी अनिश्चिळततेचे सावट आहे.