माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का? अजितदादांची नाराजी, पण शेतकऱ्यांचा पाठिंबा; खातेबदलाची शक्यता!

0
78

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई | २९ जुलै २०२५

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, त्यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, राजीनामा घेतला जाणार नाही, अशी मोठी अपडेट सूत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान, खातेबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.

 

अजित पवार यांची तीव्र नाराजी

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची मंत्रालयातील अँटी-चेंबरमध्ये तासभर चर्चा झाली. या बैठकीत अजित पवार यांनी कोकाटेंना थेट खडसावले.

 

“तुमच्या वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. आम्ही तुम्हाला अनेक वेळा समजावलं, पण आता मुख्यमंत्रीसुद्धा नाराज आहेत,” अशा शब्दांत अजित पवार यांनी कोकाटेंना फटकारले. कोकाटेंनी यावर स्वतःची चूक मान्य करत, यापुढे अशी चूक होणार नाही, असे स्पष्ट केले.

 

राजीनामा टळला, खातेबदलाची चर्चा

कोकाटेंचा राजीनामा मागवला जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, राजीनामा घेतला जाणार नाही. मात्र, त्यांचे खाते बदलले जाण्याची शक्यता असून, यावर महत्त्वाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

 

विवादग्रस्त विधानांमुळे अडचणीत

अधिवेशनादरम्यान कोकाटे मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.यानंतर त्यांनी सरकारबद्दल “सरकार भिकारी आहे” असे विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला.विरोधकांनी राजीनाम्याची मागणी करत सरकारला कोंडीत पकडले होते.

 

शेतकऱ्यांचा पाठिंबा – राजीनामा नको!

या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेऊन कोकाटेंच्या समर्थनार्थ भूमिका मांडली.”कोकाटे हे सक्रिय आणि शेतकऱ्यांचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ नये,” अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावर अजित पवारांनी सांगितले की, “हा विषय आता माझ्या हातात नाही”, असे उत्तर दिले होते.

 

सध्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर

वाद असूनही माणिकराव कोकाटे हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले आहेत. यावरून त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट होते.

 

 

राजकीय समन्वयाचा कस लागणार

कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांनी सरकार अडचणीत सापडले असले तरी, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील समन्वय आणि अंतर्गत राजकीय तोल सांभाळत या प्रकरणावर मार्ग काढला जात आहे.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here