पुणे पोलिसांवर अब्रूनुकसानीचा दावा करणार – एकनाथ खडसेंचा रेव्ह पार्टी प्रकरणावर संतप्त आरोप

0
167

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे | २९ जुलै २०२५

पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टीवर छापेमारी करत पुणे पोलिसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली. या प्रकरणानंतर खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले असून, “अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,” असे जाहीर विधान केले आहे.

 

 

“रेव्ह पार्टी नव्हतीच, फक्त बदनामीचा डाव!”

खडसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे म्हटले की, “त्या ठिकाणी ना मोठा आवाज होता, ना नाच-गाणं. मग पोलिसांनी रेव्ह पार्टीची व्याख्या आधी स्पष्ट करावी. केवळ खडसे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी ही कारवाई केली गेली,” असा आरोप त्यांनी केला.

 

 

“प्रांजलवर पाळत ठेवली जात होती”

एकनाथ खडसे यांनी दावा केला की, “प्रांजल खेवलकरवर आधीपासूनच पाळत ठेवली जात होती. सिव्हील ड्रेसमधील पोलीस त्याच्या हालचाली लक्षात घेत होते.” प्रांजलने खडसेंना सांगितले की, “मी कधीच ड्रग्ज घेतले नाहीत,” असेही त्यांनी सांगितले.

 

 

“2.7 ग्राम दाखवून फसवणूक”

खडसे यांनी म्हटले, “2 ग्राम गांजावर जामीन मिळतो, त्यामुळेच मुद्दाम 2.7 ग्राम दाखवण्यात आले. प्रांजलकडे काहीच सापडले नाही, ड्रग्ज एका मुलीकडे सापडला, तरीही जावयाला अडकवले.”

 

 

“मोबाईल जप्त… मग फॅमिली फोटो बाहेर कसे?”

पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल व लॅपटॉपमधून कुटुंबीयांचे खाजगी फोटो बाहेर कसे आले, असा सवाल करत खडसे यांनी याला “संपूर्ण कट कारस्थान” असे म्हटले. ससून हॉस्पिटलचा रिपोर्ट बाहेर कसा आला? ड्रग्ज चाचणीचा रिपोर्ट अद्याप का नाही आला? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

 

 

“रोहिणी खडसे बोलत आहे म्हणून टार्गेट?”

खडसे यांनी या कारवाईमागे राजकीय सूडभावना असल्याचाही संशय व्यक्त केला. “माझी सून रोहिणी खडसे सध्या सरकारविरोधात स्पष्टपणे बोलत आहे, म्हणूनच हे प्रकरण उभं केलं जात आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

 

 

“सरकार आणि पोलिसांनी उत्तर दिलं पाहिजे”

“जर आमच्याकडून काही चुकीचं घडलं असेल तर कारवाई करा. पण फसवणूक करून आम्हाला बदनाम कराल, तर आम्ही दबून जाणार नाही,” असा इशारा खडसे यांनी दिला. याप्रकरणी पुणे पोलिसांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, यासाठी वकिलांशी चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here