
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे | 26 जुलै 2025
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा सक्रीय भूमिकेत दिसले. आज सकाळी अजित पवारांनी हिंजवडी मेट्रो प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अनधिकृत बांधकामांवरून अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. विशेष म्हणजे, एका विकासकाला तर त्यांनी थेट सुनावलं, “तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची व्हायची का?”
मेट्रो पाहणी दरम्यान कडक निर्देश
हिंजवडी परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचं काम वेळेत आणि नियमानुसार व्हावं, यासाठी आज सकाळी अजित पवार स्वतः पाहणीसाठी दाखल झाले. सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करणारे आणि शिस्तप्रिय नेते म्हणून ओळख असलेले अजित पवार, यावेळी अधिकाऱ्यांवर विशेष नाराज होते.
“कोणालाही कामात येऊ देऊ नका.
कुणीही मध्ये आलं, तरी 353 टाका.
अजित पवार जरी आला, तरी टाका!”
अशी थेट तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यांना सूचवायचं होतं की कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता, नियमांचे पालन करूनच कामे झाली पाहिजेत.
ओढ्यावर अनधिकृत भाजी मंडई – थेट आदेश देऊन पाहणी
हिंजवडीजवळील माण ग्रामपंचायतीने नाल्यावर उभारलेली अनधिकृत भाजी मंडई हे अजित पवारांच्या निरीक्षणात आले. त्यांनी तात्काळ हे बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. आज त्यांनी त्या पाडकामाची स्वतः पाहणी केली आणि कार्यपद्धती तपासली.
पाणी साचतंय, बस अडकतेय – कारण विकासकांचे गैरकृत्य!
हिंजवडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. बससह अनेक वाहने पाण्यात अडकत आहेत. याला कारणीभूत ठरले आहेत नाल्यावर आणि जलवाहिन्यांवर केलेली अनधिकृत बांधकामं.
“तुम्ही इथे पैसा कमवता आणि बदनामी आमच्या राज्याची होते.
तुमच्यामुळे बस पाण्यात जाते, वाहतूक अडते, नागरिक त्रासलेत!
ही परिस्थिती आम्ही सहन करणार नाही,”
असं थेट आणि रोखठोक शब्दांत अजित पवारांनी विकासकाला सुनावलं.
शासनाची भूमिका स्पष्ट – नियम तोडणाऱ्यांवर कारवाई ठरलेली!
अजित पवारांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की कोणताही राजकीय दबाव, कोणत्याही थरावर मान्य केला जाणार नाही. “हे काम अर्धवट नको, एकदाच संपूर्ण करा. ‘माझं हे करा, माझं ते करा’ प्रकार आता थांबवायचा!” अशी सक्त ताकीदही दिली.
अजित पवारांची कार्यशैली पुन्हा चर्चेत
या पाहणी दौऱ्यामुळे अजित पवारांची वेळेचे काटेकोर पालन, कामाच्या बाबतीतली स्पष्ट भूमिका आणि अनधिकृत कामांवर ठाम कारवाई ही कार्यशैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
ते फक्त सांगत नाहीत, तर ते स्वतः जाऊन कामाची पाहणी करून प्रशासनाला उत्तरदायी धरतात, हे आजच्या दौऱ्याने पुन्हा सिद्ध झालं.