
माणदेश एक्सप्रेस न्युज : तासगाव : सावळज (ता.तासगाव) येथील नवविवाहित कावेरी चव्हाण हिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती शेळके यांचा निलंबन व शिस्तभंग कारवाई प्रस्ताव आरोग्यसेवा आयुक्त मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. तेंव्हा डॉ.आरती शेळकेवर निलंबन कारवाई आदेश पारित करावा.अशी मागणी सार्व.आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांचेकडे दलित महासंघ (मोहिते गट) राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सावळज येथे कावेरी चव्हाण या घरी दुपारी झोपल्या असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. यावेळी त्यांना उपचारासाठी सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.परंतु यावेळी दवाखान्यात दोन्हीही डॉकटर गैरहजर होते. परिणामी वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने कावेरी चव्हाण यांचा मृत्यू झाला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजयकुमार वाघ यांनी आरोग्य केंद्रात गैरहजर प्रकरणी वैद्यकीय डॉ.नंदिनी मालेदार यांना तातडीने सेवा मुक्त केले आहे.व डॉ.आरती शेळके यांची बदली करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला आहे.डॉ.आरती शेळके सावळजमध्ये शासकीय निवासस्थानी राहत नसत.आरोग्य केंद्रात वारंवार गैरहजर राहत.दिव्यांग गरीब लोकांना उपचारासाठी ताटकळत ठेवत. जुजबी उपचार करून रुणांना पाठवत.
रुग्णांशी उद्धट वर्तन करतात.
डॉ.आरती शेळके यांचेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी सांगली यांच्या चौकशी अहवालातील निलंबन व शिस्तभंग कारवाईस आरोग्य उपसंचालक कोल्हापूर यांनी सहमती दर्शविली आहे. आरोग्यसेवा उपसंचालक कोल्हापूर यांनी डॉ.आरती शेळके यांच्यावरील निलंबन कारवाईसाठीचा प्रस्ताव आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई कार्यालयास पाठविला आहे. तेंव्हा डॉ.आरती शेळके यांचेवर तातडीने शिस्तभंग व निलंबन कारवाई करावी.अशी मागणी निवेदनात दलित महासंघ (मोहिते गट) राज्याध्यक्ष प्रशांत केदार,सचिन पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांचेकडे निवेदनात केली आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करु.संबधित वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती शेळके या दोषी आढळून आलेस त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांना दिले.