
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | 11 जुलै 2025
देशातील आधार कार्ड संदर्भात मोठा बदल होणार असून, त्याचा परिणाम पॅनकार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आणि अन्य सरकारी कागदपत्रांवर होणार आहे. बोगस ओळखीचा वापर करून आधार कार्ड तयार करणाऱ्यांना रोखण्यासाठी UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या युक्तिवादात हे समोर आलं आहे की, मोठ्या प्रमाणात बांगलादेशी, रोहिंग्या आणि इतर विदेशी नागरिक बोगस कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड तयार करून भारतीय सुविधांचा लाभ घेत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता आधार कार्डसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली जाणार आहे.
काय बदल होणार आहेत?
- आधारसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची क्रॉस व्हेरिफिकेशन (उलट तपासणी) होणार.
- पॅनकार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, दहावीच्या शालांत परीक्षा प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र यांचा डेटा आधारशी लिंक केला जाणार.
- ही सर्व प्रक्रिया KYC (Know Your Customer) अंतर्गत अधिक कठोर करण्यात येणार आहे.
- वाहन परवाना, मनरेगा जॉब कार्ड, वीजबिल अशा दस्तावेजांवरही बारकाईने छाननी केली जाणार.
- आधार कार्ड ही केवळ ओळखीचा पुरावा असून, भारतीय नागरिकत्वाचे प्रमाण नसल्याचे UIDAI ने स्पष्ट केले आहे.
बोगस दस्तावेजांवर सरकारची कारवाई
गेल्या काही वर्षांत अनेक परप्रांतीय आणि विदेशी नागरिकांनी खोट्या दस्तावेजांच्या आधारे देशात रेशन कार्ड, आधार, मतदान कार्ड आणि अन्य सरकारी सुविधा मिळवलेल्या आहेत. यामध्ये मुंबई, दिल्ली, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येने वसले असल्याचं गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि खऱ्या भारतीय नागरिकांचा डेटा अधिक सुरक्षित करण्यासाठी UIDAI एक विशेष प्रणाली तयार करत आहे.
आपल्याला काय करावे लागेल?
- आपल्या सर्व दस्तावेजांची आधारशी लिंक पडताळून घ्या.
- नवीन आधार बनवताना किंवा अपडेट करताना मूळ दस्तावेज तयार ठेवा.
- कोणतीही माहिती चुकीची किंवा फसवणूक करणारी असल्यास ती त्वरित सुधारावी.
- सरकारी वेबसाईट किंवा अधिकृत केंद्रांमार्फतच आधार अपडेट प्रक्रिया पूर्ण करा.