वारीहून परतलेल्या आजोबांचा अपघाती मृत्यू; नातू जखमी – राज्यात अपघातांची मालिका सुरूच

0
217

माणदेश एक्स्प्रेस न्यूज

पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीनंतर आपल्या लाडक्या नातवाला भेटण्यासाठी आलेल्या ६० वर्षीय आजोबांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला असून, ७ वर्षांचा नातू गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना वसईत घडली आहे. अपघातानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुन्हा एकदा रस्ते अपघातांच्या भीषण वास्तवाची आठवण करून देणाऱ्या घटनांची मालिका सुरूच आहे.

 

मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत खाखम (वय 60) असून, जखमी नातवाचे नाव ध्रुव सिंह (वय 7) आहे. चंद्रकांत खाखम हे नुकतेच पंढरपूर वारी आटोपून आपल्या नातवाला भेटण्यासाठी वसईत आले होते. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास, ते आणि त्यांचा नातू ॲक्टिव्हा दुचाकीवरून बागेत फिरायला जात असताना, वेगात येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली.

 

धडकेनंतर आजोबा आणि नातू दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चंद्रकांत यांचा मृत्यू झाला असून, नातू ध्रुव सध्या गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, धडक देणारा दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्या दुचाकीस्वार व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

अपघातांची मालिका सुरूच…

या घटनेच्या काही तासांनंतरच मुंबई-नाशिक महामार्गावर कानिफनाथ मंदिराजवळ आणखी एक भयानक अपघात घडला. भरधाव मोटरसायकलने आयशर वाहनास जोरदार धडक दिली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
माटुंग्यात SUVखाली चिरडून आजीचा मृत्यू

 

तिसरी धक्कादायक घटना माटुंगा परिसरात घडली. ७३ वर्षीय जयाबेन पारख या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या असताना, SUV पार्क करताना चालकाचा पाय चुकून एक्सेलरेटरवर गेला आणि गाडी थेट त्यांच्या अंगावर धडकली. गंभीर जखमी अवस्थेत सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
SUV चालक मनोहर ताडुक याच्यावर निष्काळजीपणाने वाहन चालवून मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संपादकीय प्रश्न:

 

वारी, भक्ती आणि देवदर्शनाने भरलेला दिवस, तोच संध्याकाळी मृत्यूच्या सावलीत लपला. राज्यात वाढत्या रस्ते अपघातांची जबाबदारी कोण घेणार? वाहनचालकांची बेपर्वाई, मद्यधुंद स्थितीतील ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन – हे आपल्या लोकांच्या प्राणावर उठत आहे.

 

कुठल्याही क्षणी… कुणालाही… काळ गाठू शकतो, रस्त्यावर.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here