
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई
गेल्या अनेक दशकांपासून मुंबईतील गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरांसाठी लढा देत आहेत. मात्र, अद्यापही त्यांचे पुनर्वसन पूर्णत्वास गेलेले नाही. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका करत गिरणी कामगारांच्या हक्कासाठी मोठी भूमिका जाहीर केली.
“उद्धव ठाकरे यांनी जो प्रस्ताव दिला आहे, त्यानुसार धारावी पुनर्वसन प्रकल्पातील जागांमध्ये गिरणी कामगारांना प्राधान्याने घरे मिळाली पाहिजेत,” अशी ठाम मागणी संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
त्यांनी सरकारला विचारले, “ज्या जागा तुम्ही अदानी समूहाला दिल्या आहेत, त्या जागांमध्ये गिरणी कामगारांसाठी का नाही? मुंबईतच त्यांना स्थायिक करायला हवं, अन्यथा हे भूखंड अदानीला देण्याचा काय अर्थ?”
धारावी प्रकल्पात टीडीआर, मदर डेअरी, दहीसर, मुलुंड, मिठागर, अशा अनेक महत्त्वाच्या जागा अदानी समूहाला दिल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले,
“मुंबईचा गिरणी कामगार हा इथला भूमिपुत्र आहे, मराठी माणूस आहे. त्याला मुंबईच्या बाहेर ढकलणं अन्यायकारक आहे. आमची मागणी कायम आहे की धारावी प्रकल्पात त्यांचा समावेश झाला पाहिजे.”
राऊत यांनी सांगितले की उद्धव ठाकरे स्वतः गिरणी कामगारांच्या मोर्चात सहभागी होणार आहेत.
“हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवतंय हेच कळत नाही. शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, कामगार रस्त्यावर उतरलेत, सरकार केवळ उद्योगपतींच्या बाजूने झुकतंय,” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्यावर केलेल्या मारहाणीच्या घटनेवरून राऊत भडकले.
“जर डाळ खराब असेल, तर जबाबदार कोण? तुमचं सरकार! डाळ मिळाली नाही म्हणून मारहाण करणं ही कायद्याची थट्टा आहे. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ट्विटरवरून ही माहिती दिली आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“तक्रार करण्याचे संसदशीर मार्ग आहेत. हात उचलणं ही शिवसेनेची परंपरा नाही. हे वर्तन आमदारांना शोभणारं नाही,” असेही ते म्हणाले.