
मुंबई | माणदेश एक्स्प्रेस न्यूज : राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी शिक्षकांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज ठाम पाठिंबा दर्शवत राज्य सरकारला २४ तासांत निर्णय घेण्याचं थेट आवाहन केलं आहे.
विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानमंडळात घेतला होता. याबाबत शासन निर्णयदेखील काढण्यात आला होता. मात्र, अद्यापही निधीची कोणतीही तरतूद सरकारकडून झालेली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शरद पवार यांनी आंदोलनस्थळी शिक्षकांशी संवाद साधताना सांगितले,
“गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांना न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शिक्षक म्हणजे नवी पिढी घडवणारा महत्वाचा घटक. त्यांच्यावर पावसात आणि चिखलात बसण्याची वेळ येणं दुर्दैवी आहे.”
त्यांनी राज्य सरकारला इशार्याहच्या सुरात म्हटलं,
“एक दिवसात या प्रश्नावर निर्णय घ्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा. मी सरकारमध्ये राहिलो आहे, निधीची तरतूद कशी करायची आणि निर्णय कसा अंमलात आणायचा हे मला माहिती आहे.”
शरद पवारांनी यावेळी जुन्या आंदोलनांची आठवण करत सांगितले की,
“१९८०-८१ मध्येही शिक्षकांनी असेच आंदोलन केलं होतं. त्यावेळी मी राज्याच्या जबाबदारीवर होतो आणि आम्ही ठामपणे निर्णय घेतला होता की केंद्र सरकार देईल ते राज्य सरकारही देईल. आज मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.”
त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट पाहून स्पष्ट शब्दांत आवाहन केलं,
“शिक्षकांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका. त्यांना सन्मानाने जगता यावं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. शिक्षण आणि शिक्षक यांची उपेक्षा भविष्यासाठी धोकादायक आहे.”
पवारांनी शेवटी हे देखील स्पष्ट केलं की,
“शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत. तुम्ही चिंता करू नका, लढा देत राहा.”