
मुंबई | प्रतिनिधी विशेष
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधीमंडळात आज भव्य सत्कार करण्यात आला. हे संपूर्ण विधीमंडळाचे नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेचे अभिमानाचे व गौरवाचे क्षण होते. या सत्कार कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडून गवई यांचे विशेष कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात भावनिक आणि आदरयुक्त शब्दांत न्यायमूर्ती गवई यांचा गौरव केला.
“हा सत्कार केवळ विधीमंडळाचा नाही, तर १३ कोटी महाराष्ट्रवासीयांचा आहे. गवई यांना जेव्हा सत्काराची कल्पना सांगण्यात आली, तेव्हा त्यांनी फक्त अभिनंदन नको, तर संविधानावर मार्गदर्शनासाठी कार्यक्रम ठेवा, अशी विनंती केली. हाच त्यांचा विनम्रतेचा आणि संविधाननिष्ठतेचा परिचय आहे,” असे फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले की,
“गवई हे सरकारी वकील असताना नागपूरमधील झोपडपट्टी तोडण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आणि गरिबांसाठी लढले. त्यांनी न्यायालयीन कामकाजात केवळ कायद्याची तरतूदच नव्हे तर मानवतेची जाणीव देखील जपली. आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. शनिवार-रविवारी देखील ते कार्यक्रमात सहभागी होतात. एवढ्या मोठ्या पदावर असून देखील त्यांची सादगी आणि कार्यनिष्ठा हे विशेष आहेत.”
उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांचे उद्गार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गवई यांच्या नियुक्तीचा गौरव करत म्हटले,
“देशाच्या सर्वोच्च पदावर आपल्या घरातील एक व्यक्ती विराजमान झाल्याचा आनंद आज सर्व महाराष्ट्राला होत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी जे न्यायकार्य केले आहे, ते संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. देशाला असा हिरा लाभल्याचा आज खरोखर अभिमान वाटतो.”
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,
“आपल्या विधान भवनात अनेक सत्कार झाले, मात्र आजचा सत्कार इतिहासात कोरला जाणारा आहे. सरन्यायाधीशांच्या माध्यमातून न्यायसंस्थेच्या सर्वात महत्त्वाच्या जबाबदारीची पूर्तता होत असून, त्यांच्या वागणुकीत विनम्रता, संवेदनशीलता आणि न्यायनिष्ठा ही ठळकपणे जाणवते.”
ते पुढे म्हणाले,
“आज भाषणाची सुरुवात ‘माय लॉर्ड’ म्हणत केली असती, तरी वावगे ठरले नसते. न्यायसंस्थेचा सर्वोच्च मान या माध्यमातून आज विधीमंडळ देत आहे.”
अंबादास दानवे – “मराठी मातीचा सुपुत्र सर्वोच्च पदावर”
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे भूषण गवई यांच्या मराठी पृष्ठभूमीचा उल्लेख करत म्हटले –
“भूषण गवई यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आणि आज देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर विराजमान झाले. यामुळे हे सिद्ध झाले की मराठी माध्यमातील विद्यार्थीही सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचू शकतात. काही दिवसांपूर्वी मराठीबद्दल अपमानास्पद विधाने ऐकायला मिळाली होती, मात्र गवई यांनी ‘दिल्लीचे तख्त राखून, महाराष्ट्र माझा’ हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे.”
दादासाहेब गवईंचा वारसा – भूषण गवईंच्या चरित्रात दिसणारी प्रेरणा
मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी भूषण गवई यांच्या वडिलांचा, दादासाहेब गवई यांचा उल्लेख करत म्हटले,
“दादासाहेब गवई हे अजातशत्रू नेते होते. त्यांच्यात जो संयम, सौजन्य आणि सर्वसमावेशकता होती, तीच गुणवैशिष्ट्ये भूषण गवई यांच्यामध्ये दिसतात. त्यामुळेच न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद भूषवताना त्यांनी ‘संविधानात असलेली संवेदनशीलता’ जगापुढे दाखवून दिली आहे.”
गवई यांचा प्रवास – महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी
प्राथमिक शिक्षण: मराठी माध्यमातून
सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय पार्श्वभूमी
सरकारी वकील, उच्च न्यायालय न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती
१४ मे २०२५ रोजी भारताचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
न्यायदानासोबत संवेदनशील प्रशासन आणि सामाजिक समज कायम ठेवलेली भूमिका