
मुंबई : “आम्ही एकत्र आल्यामुळे यांच्या बुडाला आग लागली आहे. ती आग दाखवताही येत नाही आणि क्षमवताही येत नाही. करणार काय?” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मराठी विजयोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर घणाघात करत अनेक मुद्द्यांवर बोचरी टीका केली.
“रुदाली म्हणणं ही मानसिक दिवाळखोरी”
फडणवीस यांनी ठाकरेंच्या भाषणाला ‘रुदाली’ (हिंदीत शोक करणारी महिला) संबोधल्याने उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर देताना म्हटले, “त्याची मानसिकता समजू शकतो. मूळ भाजप मेलेला आहे. त्याचाच खून या लोकांनी केलाय. त्यांचं जे काही रुदाली चाललंय, ते उर बडवणं आहे.”
ते पुढे म्हणाले, “रुदाली हा हिंदी शब्द आहे. मराठीच्या कार्यक्रमात हिंदी शब्द वापरून हे लोक स्वतःचं अधःपतन दाखवत आहेत.”
“हे आहेत मराठीचे मारेकरी”
ठाकरेंनी भाजपवर हल्ला चढवत म्हटले, “हे लोक मराठी भाषेचे आणि मराठी अस्मितेचे मारेकरी आहेत. मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांना महाराष्ट्र ओळखू लागला आहे.”
त्यांनी भाजपा नेत्यांनी अतिरेक्यांशी असलेले कथित संबंध, त्यांच्या भाषिक धोरणांवर आणि सत्तेसाठी केलेल्या राजकारणावर प्रश्न उपस्थित केले.
“भाजपमध्ये ऊर बडवायला ओरिजिनल माणसेही राहिली नाहीत”
ठाकरेंनी भाजपमधील सध्याच्या नेतृत्वावर टीका करताना म्हटलं, “आज मूळ भाजप संपला आहे. त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ओरिजिनल माणसे राहिली नाहीत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून उरबडवे गोळा करून भाजप चालवला जात आहे.”
“संपर्कात आमचे नाही, तुमचेच लोक आहेत”
भाजपकडून सातत्याने ‘ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत’ असा दावा केला जातो. त्यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, “आम्ही एकत्र आल्यामुळेच यांच्या बुडाला आग लागली आहे. पण ती आग दाखवताही येत नाही आणि सहनही होत नाही.”