“फ्री फायर”मुळे पाच लाखांचा फटका! मुलाच्या एका क्लिकने शेतकऱ्याचं स्वप्न झालं चुराडा

0
163

माणदेश एक्सप्रेस न्यूज|कोल्हापूर 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातून एक धक्कादायक आणि विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाने ‘फ्री फायर’ या ऑनलाईन गेमसाठी वडिलांचे तब्बल पाच लाख रुपये ऑनलाईन उडवले. ही रक्कम शेतकऱ्याने आपल्या मेहनतीने गोठा वाढवण्यासाठी बँकेत साठवली होती.

काय घडलं नेमकं?

राधानगरी तालुक्यातील एक शेतकरी आणि त्याची पत्नी काबाडकष्ट करून म्हशींचा गोठा वाढवण्याचं स्वप्न बघत होते. सात लाख रुपये बँकेत साठवून त्यांनी हरियाणामधून चार म्हशी विकत घेण्याची तयारी केली होती. पण जेव्हा मे महिन्यात खात्याची चौकशी करण्यासाठी ते बँकेत गेले, तेव्हा फक्त दोन लाखच शिल्लक असल्याचं लक्षात आलं.

स्टेटमेंट काढून पाहिल्यावर ऑनलाईन ट्रान्झेक्शनद्वारे पैसे गायब झाल्याचं स्पष्ट झालं. बँकेने तांत्रिक कारणास्तव असमर्थता दर्शवत पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्याने लगेचच सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

सुरुवातीला शेतकऱ्याच्या मोबाइलमध्ये कोणतेही व्यवहाराचे मेसेज नव्हते. पण बँक स्टेटमेंट आणि ट्रान्झेक्शन आयडीद्वारे सखोल तपास केला असता, रक्कम ‘फ्री फायर’ गेमसाठी वापरण्यात आली होती. गेममधील व्हर्च्युअल शस्त्रे, स्किन्स आणि टॉप-अपसाठी हे पैसे गेले होते.

 पालकांसाठी धडा

या घटनेने स्मार्टफोनमधून बँकिंग अ‍ॅप्सशी जोडलेले खाते लहान मुलांच्या हातात दिल्यास काय परिणाम होऊ शकतो, हे ठळकपणे अधोरेखित झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते,

  • मोबाइलमध्ये बँकिंग अ‍ॅप्स ‘पिन लॉक’ने संरक्षित ठेवावेत,

  • गेम अ‍ॅप्सवर ‘पर्चेस ब्लॉक’ किंवा पासवर्ड लॉक ठेवावा,

  • मुलांच्या वापरावर नियमित नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.

 पालकांनी काय शिकायला हवं?

ही घटना फक्त आर्थिक नुकसान नाही, तर भविष्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारीही आहे. मुलांचे स्क्रीन टाईम, गेमिंग अ‍ॅप्सवरचा वेळ आणि आर्थिक व्यवहारांवर पालकांनी लक्ष ठेवणे अत्यावश्यक झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here