पुणे रेल्वे स्थानकाजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; हातात कोयता घेऊन तरुणाचा हल्ला, एकास अटक

0
166

माणदेश एक्सप्रेस न्यूज |पुणे 

पुणे रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर एका तरुणाने थेट कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या प्रकारामुळे काही वेळ रेल्वे स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

हातात कोयता घेऊन पुतळ्यावर थेट हल्ला

प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, केशरी कुर्ता घातलेला सुरज शुक्ला नावाचा तरुण रात्री रेल्वे स्थानकाच्या बाहेर हातात धारदार कोयता घेऊन आला. काही क्षणांतच तो महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ गेला, चौथऱ्यावर चढला आणि पुतळ्यावर वार करू लागला.

त्याने विशेषतः गांधीजींच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने जोरदार प्रहार केला. यावेळी आजूबाजूला असलेल्या प्रवाशांनी धसका घेत तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरोपीला ताब्यात घेतलं आणि पुतळ्यावरील हल्ला थांबवण्यात यश आलं.

उत्तर प्रदेशातून पुण्यात आलेला तरुण

प्राथमिक चौकशीनुसार, आरोपी सुरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून सध्या तो पुण्यात नोकरीच्या शोधात आला होता. त्याने हे कृत्य कोणत्या हेतूने केलं, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचा कोणत्याही संघटनेशी संबंध आहे का, किंवा हे कृत्य नियोजनबद्ध होतं का, याचा तपास सुरू आहे.

मानसिक स्थितीबाबतही संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजची मानसिक स्थितीही तपासली जात आहे. त्याने हे कृत्य पूर्णतः नियोजितपणे केलं की मानसिक असंतुलनामुळे अचानकपणे हा प्रकार घडला, हे स्पष्ट होणं बाकी आहे. यासाठी वैद्यकीय चाचणी व मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या राष्ट्रपित्यांच्या पुतळ्यावर अशा प्रकारे हल्ला होणे ही गंभीर बाब असून प्रशासनाच्या हलगर्जीवर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

रेल्वे पोलिसांनी आरोपीविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केला असून त्याची पार्श्वभूमी, संपर्क आणि हेतू याचा सखोल तपास सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here