“सरकार फक्त श्रीमंतांचे!” – शेतकरी आत्महत्यांवरून राहुल गांधींचा केंद्रावर घणाघात

0
21

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – महाराष्ट्रात केवळ तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “ही सरकार शेतकऱ्यांची नाही, तर श्रीमंतांची आहे,” असा घणाघात करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दुप्पट उत्पन्न’च्या आश्वासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

 

राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं, “जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे केवळ आकडे नाहीत, तर ७६७ उद्ध्वस्त कुटुंबं आहेत. ही अशी दु:खद कहाणी आहे, जी कधीही सावरणार नाही. पण केंद्र सरकार फक्त शांतपणे तमाशा पाहत आहे.”

 

त्यांनी पुढे म्हटलं, “शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे, खते, डिझेल सगळं महाग झालं आहे. मात्र, एमएसपीची हमी नाही, कर्जमाफी नाही. जेव्हा गरीब शेतकरी मदतीसाठी याचना करतो, तेव्हा त्याचं दुर्लक्ष केलं जातं. मात्र, श्रीमंतांच्या कोट्यवधींच्या कर्जमाफ्या मोदी सहज करतात.” यासंदर्भात राहुल गांधींनी अनिल अंबानी यांच्या ४८,००० कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचं उदाहरण दिलं.

 

राहुल गांधींनी मोदी सरकारच्या ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट’ या वचनाची आठवण करून दिली आणि ती जाणीवपूर्वक फसवणूक ठरल्याचा आरोप केला. “उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी शेतकऱ्यांचं आयुष्यच अर्धं झालं आहे. ही व्यवस्था त्यांना शांतपणे मारत आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले.

 

दरम्यान, काँग्रेस आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेत आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या १ लाख रुपयांच्या मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे. आत्महत्या प्रामुख्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये झाल्याचं समोर आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here