
माणदेश एक्सप्रेस न्यूज|नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले आहे. ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ (The Officer of the Order of the Star of Ghana) या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं असून, जागतिक स्तरावरील नेतृत्व आणि भारत-घाना संबंध वृद्धिंगत करण्यात त्यांच्या योगदानाची दखल घेत ही गौरवमुद्रा प्रदान करण्यात आली.
पंतप्रधान मोदी सध्या पाच आठवड्यांच्या विदेश दौऱ्यावर असून, घानातील अक्रा शहरात त्यांनी राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. यावेळी अधिकृत समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकृत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा पुरस्कार मी भारत आणि घानामधील ऐतिहासिक संबंध, आपल्या सांस्कृतिक वैविध्य आणि तरुणाईच्या आशा-आकांक्षांना अर्पण करतो. ही केवळ गौरवाची बाब नाही, तर दोन्ही देशांतील मैत्री बळकट करण्याची जबाबदारीही आहे.”
‘ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा पुरस्कार घानाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. २३ जून २००८ पर्यंत तो सर्वोच्च पुरस्कार मानला जात होता, त्यानंतर ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द स्टार अँड इगल्स ऑफ घाना’ या नव्या पुरस्काराची स्थापना झाली.
पंतप्रधान मोदींचा हा दौरा गेल्या १० वर्षांतील सर्वात मोठा विदेश दौरा मानला जात आहे. घानानंतर ते त्रिनिदाद अँड टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या देशांना भेट देणार असून, ६ व ७ जुलै रोजी ब्राझीलमधील रिओ दी जानेरिओ येथे होणाऱ्या ‘ब्रिक्स शिखर परिषदे’तही ते सहभागी होणार आहेत.