
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यामुळे नवा राजकीय समतोल तयार होतोय, अशातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका करत तीव्र शब्दात सवाल उपस्थित केले आहेत. “एवढं प्रेम उतू जातंय तर, भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का?” असा बोचरा प्रश्न त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना विचारला.
राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंच्या सोबत जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना राणे म्हणाले, “राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जात आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्या मार्गदर्शनाचा विषय नाही. घरं आहेत, बंधुत्व आहे, कोण कुठे जावं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे.”
राणेंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, “मराठीचा पुळका आलाय मग मुलांना इंग्रजी मिडियममध्ये का शिकवलं? स्कॉटिश स्कूलमध्ये कोणाला पाठवलं? बाळासाहेबांनी ४८ वर्षांत जे कमावलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवलं.”
ते पुढे म्हणाले, “अडीच वर्षात दोनच दिवस मंत्रालयात आले. मुख्यमंत्रीपद हे केवळ खुर्ची नव्हे, तर जबाबदारी आहे. मराठी माणसाच्या नोकरी, पोटापाण्याच्या प्रश्नांवर काय केलं? आज मराठी टक्का १८% वर घसरलाय. १९६० मध्ये तो ६०% होता. याला जबाबदार कोण?”
राणे म्हणाले, “ओरिजनल शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे. मराठी, हिंदुत्व यावर बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना राहिलेला नाही.”
उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून म्हटलं होतं की, “भाऊ एकत्र आले की, भाजप अस्वस्थ का होते?” यावर प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, “दोनच भाऊ का? सगळेच भाऊ घ्या, आम्हाला फरक पडत नाही. भाजप-शिंदे-फडणवीस युतीकडे २३५ आमदार आहेत. आमचं बहुमत ठोस आहे.”