
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : एचडीएफसी बँकेची सबसिडियरी असलेल्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या आयपीओने बुधवारी शेअर बाजारात दमदार एन्ट्री घेतली. बीएसई आणि एनएसईवर कंपनीचा शेअर अनुक्रमे ८३५ रुपये आणि ८२४ रुपये दराने लिस्ट झाला, जो IPO किंमतीपेक्षा तब्बल १२ ते १३ टक्के अधिक आहे. त्यामुळे शेअर बाजारात ‘एचडीबी फायनान्शियल’ या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, गुंतवणूकदारांच्या खात्यात चांगले लाभ जमा झाले आहेत.
२४ जून रोजी सुरू झालेल्या या IPO ला २७ जूनपर्यंतचा कालावधी होता. या दरम्यान, या इश्यूला १६.६९ पट मागणी मिळाली. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स (QIB) या गटाकडून तब्बल ५५.४७ पट, तर नॉन-इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांकडून ९.९९ पट मागणी झाली. किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये (RII) हा IPO १.४१ पट भरला.
एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या IPO मध्ये एकूण १२,५०० कोटी रुपयांचा समावेश होता. यामध्ये २,५०० कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स आणि एचडीएफसी बँकेकडून १०,००० कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (OFS) होता. या इश्यूसाठी प्राइस बँड ७०० ते ७४० रुपये ठेवण्यात आला होता.
कंपनीने या IPO अगोदरच अँकर गुंतवणूकदारांकडून ३,३६९ कोटी रुपये उभारले होते. IPO मधून मिळणारे उत्पन्न कंपनी भांडवली आधार मजबूत करण्यासाठी वापरणार आहे, जे भविष्यातील कर्जपुरवठा आणि व्यवसायवाढीसाठी मदत करेल.
एचडीएफसी बँकेचा एचडीबी फायनान्शियलमधील सध्या ९४.३६ टक्के हिस्सा आहे. आयपीओद्वारे बाजारात उतरलेल्या या NBFC कंपनीची दमदार कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. हा IPO गेल्या तीन वर्षांतील ह्युंदाईनंतरचा (₹२७,००० कोटी) दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा IPO ठरला आहे.