
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई– बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने पुन्हा एकदा आपल्या अदा आणि फॅशन सेन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नुकत्याच पार पडलेल्या ‘उमराव जान’ या क्लासिक चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान आलिया भट्टने रेखा यांच्या ‘सिलसिला’ (१९८१) चित्रपटातील प्रसिद्ध गुलाबी साडीतील लूक हुबेहूब रिक्रिएट केला. या खास लूकमुळे आलियाने रेड कार्पेटवर उपस्थित सर्वांचं मन जिंकलं.
गुलाबी रंगाची सुंदर साडी, त्याला साजेशी पर्स, पारंपरिक टिकली आणि आकर्षक कानातले – अशा पारंपरिक लूकमध्ये आलिया अत्यंत देखणी दिसत होती. तिचा हा लूक डिझायनर रिया कपूर यांनी खास रेखा यांच्या जुन्या लूकवर आधारित डिझाईन केला होता. रियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रेखा यांच्या मूळ लूकचा फोटो आणि आलियाच्या स्क्रिनिंगमधील व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली.
‘सिलसिला’ हा १९८१ साली प्रदर्शित झालेला यश चोप्रा दिग्दर्शित चित्रपट आहे. अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही संगीत, प्रेमकथा आणि फॅशनसाठी ओळखला जातो. विशेषतः रेखा यांचा गुलाबी साडीतील सौंदर्यपूर्ण लूक प्रेक्षकांच्या मनात आजही ताजा आहे.
या स्क्रिनिंगचा प्रमुख हेतू होता १९८१ साली आलेल्या ‘उमराव जान’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचं पुनरुज्जीवन. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाचं डिजिटल रीस्टोरेशन करण्यात आलं आहे. २७ जून रोजी हा चित्रपट देशभरातील निवडक चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.
आलिया भट्टचा हा साडीतील पारंपरिक लूक केवळ सौंदर्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर सिने इतिहासाला वंदन करणारा क्षण ठरला. रेखा यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीला अशा प्रकारे अभिवादन करत आलियाने एक अनोखा सांस्कृतिक दुवा प्रेक्षकांसमोर उभा केला आहे.