लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
30

माणदेश एक्सप्रेस न्यूज|कोल्हापूर : सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे अध्वर्यू असलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५१ वी जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी होत आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी अभिवादन, मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मुख्य कार्यक्रम कोल्हापूरमध्ये:
जयंतीनिमित्त कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू महाराजांच्या जन्मस्थळी सकाळी ८ वाजता अभिवादन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिसर विद्युत रोषणाईने उजळवण्यात आला असून फुलांच्या सजावटीने आकर्षक केले गेले आहे. यावेळी ३० आसन क्षमतेचे एक लघु थिएटर लोकार्पित करण्यात आले, ज्यामध्ये शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित शॉर्ट फिल्म दाखवण्यात येणार आहे.

 

दसरा चौकात अभिवादन आणि समता दिंडी:
दसरा चौकात राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टतर्फे अभिवादन करण्यात आले. तसेच, सकाळी साडेआठ वाजता ‘समता दिंडी’ शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. या दिंडीत पालकमंत्री, आमदार, खासदार, शैक्षणिक संस्था व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्याने:
भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे टेंबे रोडवरील कार्यालयात शिवशाहीर रंगराव पाटील यांचा पोवाडा आणि कवी युवराज पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. वीरशैव लिंगायत समाजातर्फे वृक्षारोपण व प्रतिमा पूजन करण्यात आले. बहुजन समाज पक्षाच्या वतीने शाहूपुरी येथील आयर्विन सभागृहात मुख्य सोहळा पार पडला. बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मिरवणुकीचे आयोजन झाले.

 

शासनाकडून जय्यत तयारी:
जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली होती. शाहू स्मारक, पुतळे, आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष सजावट व रोषणाई करण्यात आली होती.

 

सामाजिक न्याय दिन:
२६ जून हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त, शाहू महाराजांनी दिलेल्या समतेच्या संदेशाचे स्मरण करून विविध संघटनांनी सामाजिक उपक्रम राबवले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here