‘लाडकी बहीण’ योजनेवर शिंदे गटाच्या आमदाराचा सवाल

0
119

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्यातील बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी विरोधकांमुळे नव्हे, तर महायुती सरकारच्या घटक पक्षातीलच आमदाराच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे आमदार आमश्या पाडवी यांनी या योजनेबाबत चिंता व्यक्त करत स्पष्ट शब्दांत सांगितले, “ही योजना चांगली असली, तरी आदिवासींच्या विकासासाठी असलेला निधी या योजनेसाठी वापरणे अयोग्य आहे.”

 

 

आमदार पाडवी म्हणाले, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी चांगली संकल्पना आहे. मात्र ही योजना राबवताना आदिवासी विभागाच्या निधीचा वापर केला जात असेल, तर आम्ही त्याचा निषेध करतो. आमचा निधी इतरत्र वळवू नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही यासंदर्भात आदिवासी विकास मंत्र्यांना पत्रही दिलं असून, लवकरच विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरणार आहोत.”

 

 

योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील निकषात बसणाऱ्या महिलांना दरमहा ₹१५०० दिले जातात. या योजनेमुळे सरकारला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मानले जाते. मात्र योजनेतून गैरफायदा घेणाऱ्या लाभार्थ्यांची नावे पुढे आल्याने आणि योजनेत गोंधळ झाल्याचे समोर आल्याने विरोधकांनी तीव्र टीका केली होती.

 

 

पाडवी यांनी अधिवेशनात मुद्दा मांडण्याचा इशारा दिल्याने सरकारसमोरील अडचणी वाढू शकतात. “लाडकी बहीण योजना योग्य निधीतून राबवावी. आदिवासींच्या हक्काचा पैसा इतरत्र वळवू नका,” अशी ठाम मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या अंतर्गतच विरोधाची छाया निर्माण झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेभोवतीचे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here