
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : वेळेआधी दाखल झालेला मान्सून काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
१३ जूनपासून पावसाचा जोर वाढणार
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, १३ जूनपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पश्चिम घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाबरोबर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ५०-६० किमी प्रतितास इतका असू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
१४ जूनलाही पावसाचा जोर कायम
१४ जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईसह कोकणातील भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याच दिवशी पुणे, ठाणे आणि पश्चिम घाटातही जोरदार सरी कोसळतील.
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही विजांसह पाऊस
राज्याच्या उर्वरित भागांमध्येही पावसाची उपस्थिती जाणवणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
नागरिकांसाठी हवामान खात्याचा सल्ला:
- आवश्यक नसल्यास प्रवास टाळा
- नद्या व नाल्यांच्या आसपास न जाण्याचे आवाहन
- स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे
- आपत्कालीन मदतीसाठी १०७७ क्रमांकावर संपर्क साधावा
पावसाचा जोर लक्षात घेता, नागरिकांनी दक्षता घ्यावी व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.