
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई– “राज्याचा मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आपल्या मुलाला सार्वजनिक समज देत त्याच्या वक्तव्यावर मतभेद नोंदवला आहे. नितेश राणेंच्या विधानावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
गेल्या काही दिवसांत भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. “कोणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप म्हणून मुख्यमंत्री भाजपचाच असेल,” असे ते म्हणाले होते. या विधानावर विरोधकांसह भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “कोणालाही बाप काढणं हे योग्य नाही. याबाबत संबंधित मंत्र्याशी (नितेश राणे) चर्चा झाली असून अशा प्रकारची भाषा वापरणं चुकीचं असल्याचं मी स्पष्ट केलं आहे. त्यांनीही ते मान्य केलं आहे.”
यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आपल्या मुलावर नाराजी व्यक्त केली. “मुख्यमंत्री हा कोणाचाही बाप नसतो. नितेशचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा गोष्टींचं समर्थन करता येणार नाही,” असे नारायण राणे म्हणाले.
या प्रकारानंतर नितेश राणेंच्या शब्दांची दखल घेऊन पक्षातील वरिष्ठांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने, भाजपमध्ये शिस्तीच्या बाबतीत कुठलीही सवलत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. राजकीय चर्चांमध्ये देखील ही प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.