sangali : खासगी रुग्णालयात वंचितचे आंदोलन, सांगलीतील आदित्य हॉस्पिटलमध्ये तोडफोड

0
194

माणदेश एक्सप्रेस न्यूज|सांगली – विश्रामबाग चौकातील आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत तोडफोड केली. शासकीय योजनेअंतर्गत उपचार करूनही रुग्णांकडून अनधिकृतरीत्या पैसे घेत असल्याचा आरोप करत वंचितच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील काचांपासून उपकरणांपर्यंत जोरदार नासधूस केली.

 

वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “गोरगरीब रुग्णांसाठी सरकार शासकीय योजना राबवत असताना काही खासगी रुग्णालये त्याचा गैरफायदा घेत आहेत. आदित्य हॉस्पिटलमध्येही शासकीय योजनेअंतर्गत उपचार करूनही रुग्णांकडून पैसे उकळले जात आहेत.”

 

या विरोधात संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हॉस्पिटलच्या आवारातच थेट घुसून तोडफोड केली. काचांची व इतर महागड्या वस्तूंची नासधूस करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

 

दरम्यान, शंकर माने यांनी असा इशारा दिला की, “गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर अशाच पद्धतीने तीव्र कारवाई केली जाईल.” पोलिसांकडून आता पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here