
माणदेश एक्सप्रेस न्यूज |जत : जत तालुक्यातील अचकनहळ्ळी गावात रस्त्याच्या वादातून दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणात एक तरुण ठार झाला. सोमवारी (२ जून) रात्री साडे नऊच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अचकनहळ्ळी गावातील हिरोल उर्फ बाबु मल्लाळकर (वय २६) आणि मंजुनाथ काळे (वय २५) यांच्यात रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी रात्री पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला. या वादाचा परिणाम इतका गंभीर झाला की, रागाच्या भरात मंजुनाथ काळे याने लोखंडी गजाने हिरोलच्या डोक्यात जोरदार वार केला. हा वार इतका जबरदस्त होता की हिरोलचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ जत पोलिस ठाण्यात कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संशयित मंजुनाथ काळे याला पोलिसांनी अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.