
मान्सूनचे जोरदार आगमन; मध्य रेल्वे उशिराने, सखल भागांत पाणी साचले
माणदेश एक्सप्रेस न्युज|मुंबई– मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, शहर आणि उपनगरांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाने तुफान बॅटींग सुरू केली आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर बसला असून, मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत.
दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसर, घाटकोपर, भांडूप आणि ठाण्यासह नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने पुढील ३ ते ४ तासांत जोरदार पावसासह ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यांची शक्यता वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पुढील काही दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, यंदा मान्सून १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला असून, मे महिन्यातच राज्यात मान्सून पोहोचण्याची ही १६ वर्षांतील पहिली वेळ आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत तळकोकणात पोहोचलेल्या मान्सूनने आता संपूर्ण महाराष्ट्राकडे कूच केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागांतही मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.