
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई – मुंबईसह राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे. भाजपने महाविकास आघाडी, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांच्या जागेवर बसवतील, आणि महाविकास आघाडीला मुंबई महापालिकेत ५० जागाही मिळणार नाहीत,” असा दावा मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे हे बेभान नेते आहेत. ते काय बोलतात आणि त्याचे काय परिणाम होतील, याचे भान त्यांना राहिलेले नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन’ असं उद्धवजी म्हणाले होते. आज जनतेने दाखवून दिलं आहे की, भाजपा कुठे आहे आणि उद्धव ठाकरे कुठे गेले.”
शेलार यांनी स्पष्टपणे सांगितले की, मुंबई महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार आहे आणि ती जिंकणारही आहे. “महाविकास आघाडीला ५० पेक्षा कमी जागा मिळतील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना शेलार म्हणाले, “मुंबईतील नालेसफाई, रस्त्यांची अवस्था यासारख्या प्रश्नांवर हे नेते कुठेही दिसत नाहीत. ते फक्त टीव्हीवर दिसतात. टीव्हीवर झळकून मते मिळतात, हा एक मोठा गैरसमज आहे.”
दरम्यान, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने, ठाकरे गटासाठी ही निवडणूक अधिक कठीण ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.