“पवार भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका – विरोधकांवरही निशाणा

0
61

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथीच्या हालचाली सुरु असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर थेट टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सातत्याने कौतुक करणारे शरद पवार आता भाजपामय होत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांच्या सध्याच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.

 

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे पंतप्रधान मोदींच्या कामगिरीचे समर्थन करत आहेत. भारत-पाक अघोषित युद्धातील कामगिरीचं कौतुक करताना त्यांनी मोदींना सरळ ‘सर्टिफिकेट’च दिलं आहे. यामुळे शरद पवार भाजपच्या अजेंडाकडे झुकत असल्याचे आंबेडकरांचे मत आहे.

 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही भाजपाशिवाय कोणाशीही युतीस तयार आहोत.” राज्यात खरे विरोधी पक्षच शिल्लक राहिले नाहीत, असा आरोप करत त्यांनी सत्ताधारी व विरोधकांमध्ये ‘मिलीभगत’ असल्याचे स्पष्टपणे म्हटले.

 

छगन भुजबळ मंत्रिमंडळात सामील झाले असले तरी त्याचा ओबीसी समाजाला काय उपयोग होईल, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. “ओबीसी विद्यार्थ्यांना फी परवडत नाही, प्रवेश मिळाला तरी ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. मग भुजबळ ओबीसी आरक्षणासाठी कसे लढतील, हे बघायचे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनाही त्यांनी सूचक सल्ला दिला. “त्यांनी त्यांच्या खुर्चीची इभ्रत राखावी. ज्यांनी त्यांचा सन्मान केला नाही, अशा अधिकाऱ्यांना नोटीस द्यावी. लोकांनी त्यांना त्या पदावर बसवले आहे, त्यामुळे पदाची प्रतिष्ठा राखणे हे त्यांचे कर्तव्य आहे,” असे आंबेडकर म्हणाले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here